राहुरीत तळीरामांचा धिंगाणा; पैशांवरून हॉटेल कामगारांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणातून राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील ‘सह्याद्री’ हॉटेलमध्ये नऊ तळीरामांनी धिंगाणा घातला. यावेळी हॉटेलचे मालक व कामगारांना मारहाण करीत गल्ल्यातील रोख रक्कम काढून नेली. तसेच आम्ही या भागातील ‘भाई’ असून, परत बिल मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.

स्वप्नील चंद्रभान काळे यांचे राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे ‘सह्याद्री’ हॉटेल आहे. 20 मे रोजी रात्री 10.30च्या सुमारास नऊ तरुण हॉटेलमध्ये आले. त्यांनी खाणेपिणे झाल्यानंतर नऊ हजार 875 रुपयांचे बिल मागितले असता, त्यांनी हॉटेलमालक आणि कामगारांना मारहाण करीत काऊंटरच्या गल्ल्यातील अडीच हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. ‘आम्ही या भागातील भाई असून, या परिसरातील कोणत्याही हॉटेलमध्ये बिल देत नाही. पुन्हा कधीही तुझ्या हॉटेलमध्ये आलो तर बिल मागायचे नाही. तू जर पुन्हा आम्हाला बिल मागितले तर तुला ठार मारून टाकू,’ अशी दमबाजी केली. यावेळी त्यांनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड केली.

हॉटेलमालक स्वप्नील काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आसिफ रहेमान सय्यद, प्रफुल्ल चंद्रभान ओहोळ, अनिल चंद्रभान ओहोळ (रा. गुहा, ता. राहुरी), सागर कांतीलाल उल्हारे (रा. राहुरी फॅक्टरी), तसेच त्यांच्यासोबतचे इतर पाच अनोळखी इसम अशा नऊजणांवर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.