कर बचत तो हो बचत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

एका फायनान्शिएल एज्युकेशन कंपनीच्या पाहणीत असं आढळून आलंय की, फक्त 23 टक्के लोक बचत करतात व 77 टक्के लोक बचत का करू शकत नाही हे इतरांना पटवून सांगतात. यांच्याकडून वाढलेल्या खर्चाच्या, महागाईच्या तसेच काढलेल्या कर्जाच्या सुरस कथा आपल्याला ऐकायला मिळतात. खरं तर खर्च असणारच, महागाई तर वाढणारच आणि घरासारख्या मोठय़ा गोष्टीसाठी कर्ज तर काढायला लागणारच. मग काय अशी गोष्ट आहे जी बचतीची जानी दुश्मन झाली आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जी 77 टक्के लोक बचतीच्या नावाने नाके मुरडतात ती उत्पन्न-खर्च या समीकरणात फसलेली आहेत. त्यामुळे पैसा हातात आला की पहिल्यांदा खर्च करायला सुरुवात करतात. आता मला सांगा, खर्चावर आपलं काय नियंत्रण आहे? महिन्याला एक लाख मिळाले तरी खर्च होतील किंवा दहा लाख मिळाले तरी अजून हवे असे वाटतील. जेवढे पैसे जास्त मिळत जातात त्याप्रमाणे आपली जीवनशैली पण वाढते. मग ‘ऑप्शन’ला काय पडतं? इमर्जन्सी फंड, मुलांच्या उच्च शिक्षणाच्या व लग्नाच्या फंडची तरतूद आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे, आपली भविष्यात आत्मसन्मान राखणारी निवृत्तीची तरतूद. हो बचत न झाल्याने हे सर्व महत्त्वाचे विषय ऑप्शनला पडतात.

आठवून तर बघा करीअरच्या सुरुवातीचे दिवस. जेव्हा पैसे कमी कमवायचो तेव्हा छोटय़ा अंतरासाठी पायी चालत जायचो. थोडा पगार किंवा नफा वाढला की बस, नंतर रिक्षा, नंतर बाईक, नंतर कार, नंतर ड्रीम कार. कधी  संपल्या आहेत का आपल्या गरजा? त्या तर वाढत जाणारच. खर्चावर काय कंट्रोल आहे तुम्हीच सांगा.

आपल्याला वाटतं आपण जे पैसे कमवतो ते सर्व आपले आहेत व ते आता खर्च करू शकतो, पण आपण तर पूर्णपणे विसरतो कमवलेल्या उत्पन्नापैकी एक भाग माझा नाही. तो आहे माझ्या नजीकच्या काळात लागणाऱया तसेच भविष्यात लागणाऱया माझ्या गरजांचा. ज्या महत्त्वाच्या गोष्टी मी ऑप्शनला टाकल्यात त्या साकार करण्यासाठी मला बचत करणे खूप खूप महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा या गरजा समोर येतील तेव्हा मात्र त्या गरजा भागविण्यासाठी मला कर्जावर अवलंबून राहायला लागेल किंवा कुणाच्या दयेवर.

बचत न होण्याच्या समस्येवर मला मात करायची असेल तर मी माझे खर्चाचे समीकरण बदलायला हवे ही जाणीव प्रत्येकाला  व्हायला हवी, तरच बचत न होण्याच्या समस्येवर आपण मात करू शकतो. उत्पन्न-खर्च–बचत हे समीकरण बदलून आता उत्पन्न-बचत-खर्च हे समीकरण बदलायला हवे तर आणि तरच आपण बचत करू शकतो हे सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे आणि ही बचत करताना बचतीला आपल्या दैनंदिन गरजांचा भाग म्हणून पाहिलं तरच बचत करताना वाईट वाटणार नाही.

या बदलल्या समीकरणाबरोबर जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, आपल्या उत्पन्नाचे नियोजन कसे करायला हवे? किती प्रमाणात बचत करायला हवी? कर्जाचा हप्ता किती असायला हवा? आपल्या घरच्या खर्चासाठी काय बजेट ठेवायला हवे याचे नियोजन करणे आवश्यक आहे.