कवडसे – बंध मनाचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

संध्याकाळ नेहमीप्रमाणे हळूहळू विरून जात होती. रात्र आपलं अंग पसरू लागली होती. चांदण्या जमा होऊ लागल्या होत्या. चंद्राचा मंद प्रकाश पसरू लागला होता. सारा आसमंत मंत्रमुग्ध वाटत होता, पण त्या क्षणी माझं मन वेगळ्याच विचारात गुंतलं होतं. मला वाटत होतं की, कोवळी उन्हं जेव्हा पहाटे माझ्या अंगणी येतील तेव्हा त्यांचं कोवळं रूप मनाला खूप भावून जाईल. मला वाटत होतं की, तिने असंच समोर उभ राहावं, पण ती पहाट तशी समोर येतच नाही. कारण तिच्या नंतर येणारी दुपार त्या पहाटेचं अस्तित्व पुसून टाकते. त्यामुळे पहाटेला विरून जावं लागतं. मग दुपार येते. पुन्हा मन झाडांच्या गर्द सावलीत शांत होऊन जातं. त्या सावलीला नाहीशी करणारी संध्याकाळ हळूहळू येते. मग ती दुपारसुद्धा विरून जाते.

सृष्टीतले सगळे प्रहर एकामागोमाग येत जातात. एकमेकांचे अस्तित्व हिरावून स्वत पसरू लागतात, पण ही गोष्ट मनाला मात्र कळत नाही. मन फार हट्टी असतं. त्याला ते प्रहर जपून ठेवायचे असतात. अगदी हृदयात घट्ट कोरून ठेवायचे असतात. सुंदर रात्र, सुरंगी संध्याकाळ, कोवळी उन्हं, निसटती दुपार, झाडांची सावली, पाखरांचा किलबिलाट… या सगळ्या निसर्गातल्या गोष्टींना बंधन आहे. प्रत्येक गोष्टीला बंधन आहे वेळेचं आणि ऋतूचं. त्या बंधनाप्रमाणेच सगळे प्रहर येतात आणि जातात. निसर्ग कितीही अथांग असला तरी त्याहूनही अथांग असतं ते आपलं मन. त्या मनाचा थांग घेताच येत नाही आपल्याला कधी. कारण निसर्ग नियमाप्रमाणे ऋतू जरी येत-जात असले, बदलत असले तरी मनाला वाटेल तेव्हा, हवं तसं त्या ऋतूंना अनुभवता येतं. पावसाळी रात्री कधी मनाला दूर घेऊन गेल्या तरी जुन्या आठवणींच्या गावी मात्र भर पावसातही ग्रीष्माच्या झळा जाणवतात मनाला. कधी वैशाखात आपलं मन कुणाच्या तरी विचाराने श्रावणसरी झेलायला झेपावतात. मनाला कसलंच बंधन नसतं. ते कसंही वागतं. काही विचार न करता जगतं. असं आयुष्य आपल्या बुद्धीला जगता येत नाही.

कसं जगणार? कारण तर्कावर आधारलेली असते बुद्धी. जर बुद्धीला मनासारखं जगता आलं असतं तर खूप गोष्टी झाल्या असत्या मनासारख्या. जो तो आपल्या मनासारखा वागायला लागला असता. मग कसलाच अर्थ उरला नसता या आयुष्याला. नदीसुद्धा तिच्या मनासारखी वाहू लागली असती आणि पाऊससुद्धा त्याच्या मनासारखा बरसू लागला असता. कधीही, कसाही, केव्हाही. रात्र कधीही आली असती, केव्हाही गेली असती. दिवस कधीही उगवला असता, कधीही मावळला असता, पण असं होत नाही. कारण त्यांना निसर्गाची बंधन आहेत. ही सगळी बंधनं तोडता येतात ती फक्त मनाला. म्हणून मन बुद्धीच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतं. त्याच्या या स्वभावामुळेच मनाला चंचल, लहरी म्हटलं जातं, पण मनाला त्याची पर्वा असते कुठे? त्याला फक्त ठाऊक असतं कल्पनेच्या आभाळात स्वच्छंदपणे बागडणं, हुंदडणं… जिथवर जाता येईल तिथवर जाणं. समोरच्या मनाच्या तळाशी शिरून त्याच्या अंतरंगात बुडून जाणं. म्हणूनच ते बेफिकीरपणे आजपर्यंत कोणाचंही बंधन न जुमानता जगत आलंय आणि इथून पुढेही ते तसंच जगत राहील. कायम.

मन अमर्याद असतं. अमर्याद फिरत्या मनाला बंधन असतं ते दुसऱया वेडय़ा मनाचं. त्या मनाला ते बंधनात अडकवू शकतं. ते बंधन असतं काही क्षणांचं, काही दिवसांचं, काही वर्षांचं, तर कधी काही जन्मांचंही आणि अशा मनाच्या शोधात प्रत्येक मन असतं. आपल्यापेक्षाही दूर जाणारं मन जेव्हा त्या मनाला भेटतं तेव्हा ते मन आपल्याला भेटलेल्या मनासोबत अलगदपणे निघून दूरच्या प्रवासाला निघून जातं.

शेवटी काय, मनाला एकच गोष्ट हवी असते. या सृष्टीतली, या जगातली या आसमंतातली सारी कुंपणं तोडून जमेल तितकं दूर जायचं. दुसऱया मनाचा आधार घेऊन जायचं झालं तरीही आपल्या मनाची तयारी असते. म्हणूनच दोन मनं जेव्हा जवळ येतात तेव्हा ती एका अथांग प्रवासाची नांदी असते.

[email protected]