
डॉ.मधुकर बाचूळकर
हिंदुस्थानमध्ये जैवविविधता विपुल प्रमाणात असूनही त्याचा पुरेसा अभ्यास होताना दिसत नाही. त्याचबरोबर त्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनाही होताना दिसत नाहीत. आज भूतलावर अस्तित्वात असणाऱ्या जैवविविधतेपैकी 20 टक्केच प्राणी-वनस्पती-सूक्ष्म जीवांविषयी मानवाला माहिती आहे असे म्हटले जाते. 2015 मध्ये झालेल्या संशोधनातून प्राणी आणि वनस्पतींच्या 445 नव्या प्रजाती सापडल्या आहेत. निसर्गामध्ये नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते. त्यामुळेच दर पाच अथवा दहा वर्षांनी याबाबतचा अभ्यास होणं गरजेचं आहे.
दरवर्षी 22 मे रोजी जागतिक जैवविविधता दिन (इंटरनॅशनल डे फॉर बायोडायव्हर्सिटी) साजरा केला जातो. या भूतलावर विपुल प्रमाणावर जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) आहे, पण विज्ञान-तंत्रज्ञान इतकं प्रगत आणि विकसित झालेलं असतानाही पृथ्वीतलावरील सर्व सजीवांचा, वनस्पतींचा अभ्यास अद्यापही अपूर्ण आहे. पृथ्वीतलावर कोटय़वधी प्रकारच्या सजीवांच्या जाती-प्रजाती अस्तित्वात असल्या तरी त्यापैकी मानवाला आणि विज्ञानाला केवळ 20 टक्के जैवविविधता परिचित आहे. सर्वसाधारणपणे 13 लाख प्राण्यांच्या जाती-प्रजाती आणि वनस्पती व सूक्ष्म जीवांच्या सात लाख जाती-प्रजाती विज्ञानाला माहीत आहेत. पृथ्वीतलावर आज अस्तित्वात असणारी सजीव सृष्टी अथवा जैवविविधता विकसित होण्यासाठी निसर्गाला कोटय़वधी वर्षांचा कालावधी लागला आहे. ही सर्व जैवविविधता उपांतीच्या प्रािढयेमधून सुरू झालेली आहे. ही उपांती सजीवांच्या उत्पत्तीपासून आज अखंडितपणे सुरू आहे आणि भविष्यातही ती तशीच सुरू राहणार आहे. उपांतीच्या या प्रवाहामध्ये ही जैवविविधता निर्माण होत असताना काही नैसर्गिक कारणांमुळे सजीवांच्या काही जाती-प्रजाती नष्ट झाल्या; पण त्याच वेळी नवीन प्रजाती तयार होण्याची प्राक्रियाही सुरूच राहिली आहे.
जैवविविधता आणि भूप्रदेश पृथ्वीतलावर उष्ण कटिबंधातील भूप्रदेशांमध्ये (ट्रॉपिकल झोन) जैवविविधतेचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. शीत कटिबंधातील भूप्रदेशांमध्ये ते तुलनेने कमी असून ध्रुवीय प्रदेशामध्ये अत्यल्प प्रमाणात जैवविविधता आहे. त्यामुळे उष्ण कटिबंधातील भूप्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा आहे. या भूप्रदेशामध्ये असणाऱ्या वर्षावनांमध्ये (ट्रॉपिकल रेन
फॉरेस्ट) जगातील सर्वात महत्त्वाची जैवविविधता आहे. मात्र पृथ्वीवरील एकूण जमिनीच्या केवळ सात टक्के भूभागावर अशी वर्षावने आहेत. म्हणजेच जगातील निम्म्याहून अधिक जैवविविधता केवळ सात टक्के भागामध्ये आहे आणि म्हणूनच ती सर्वाधिक महत्त्वाची आहे. मानवाने त्याच्या सोयीनुसार या उष्ण कटिबंधामध्ये देश-प्रदेश तयार केले आहेत. जगाच्या पाठीवरील 17 देश हे प्रामुख्याने जैवविविधतेने संपन्न, समृद्ध आहेत. सुरुवातीच्या काळात केवळ बारा देशांतच जैवविविधतेची विपुलता आहे असे मानले जात होते, पण जसजसा अभ्यास होत गेला तसतसे 17 देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जैवविविधता असल्याचे समोर आले. यापैकी 12 देश हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यामध्ये हिंदुस्थानचा समावेश आहे. त्यामुळे हिंदुस्थान हा जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असणारा भूप्रदेश आहे.
हिंदुस्थानमध्ये आजमितीला प्राण्यांच्या सुमारे 98 हजार प्रजाती असून वनस्पतींच्या 48 हजार प्रजाती आहेत असे मानले जाते. जगातील एकूण जैवविविधतेच्या 6.7 टक्के जैवविविधता हिंदुस्थानात आहेत. जगभरातील एकूण वनस्पती संपदेच्या 7.1 टक्के वनस्पती हिंदुस्थानात आहेत; तर भूतलावरील एकूण प्राण्यांच्या प्रजातींपैकी 6.7 टक्के प्राणी-प्रजाती हिंदुस्थानात आहेत. यावरून हिंदुस्थानची समृद्धता लक्षात येते. हिंदुस्थानमध्ये जैवविविधतेनं संपन्न असणारे चार प्रमुख प्रदेश आहेत.
ईशान्य हिंदुस्थान (ईस्टर्न हिमालयन रिजन) : यामध्ये अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, नागालँड, आसामचा काही भाग समाविष्ट आहे. या प्रदेशातील जंगलांमध्ये हिंदुस्थानातील सर्वात मोठी जैवविविधता आहे. आजवर झालेल्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, या भागामध्ये 9000 सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यापैकी 3500 प्रजाती या ‘एण्डेनिक’ आहेत. (एण्डेनिक म्हणजे त्या ठरावीक भूप्रदेशावरच उगवतात. जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही आढळत नाहीत). त्यामुळे हा भूप्रदेश अधिक महत्त्वाचा मानला जातो.
पश्चिम घाट : पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध असलेला हिंदुस्थानातील दुसऱ्या ाढमांकाचा भूप्रदेश आहे. पश्चिम घाटामध्ये गुजरातचा काहीसा भाग, महाराष्ट्राचा बराचसा भाग, गोवा, कर्नाटक, तामीळनाडूचा काही भाग आणि केरळचा अंतर्भाव होतो. आजवरच्या संशोधनामधून पश्चिम घाटामध्ये सुमारे 4500 सपुष्प वनस्पती आढळून आलेल्या आहेत. यापैकी जवळपास 1500 सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती एण्डेनिक आहेत. त्यामुळेच ईशान्य हिमालयन रिजनबरोबरच पश्चिम घाट हादेखील जागतिक स्तरावर महत्त्वाचा मानला जातो.
पश्चिम हिमालय प्रदेश (वेस्टर्न हिमालयन रिजन) : यामध्ये कश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा समावेश होतो. इथेही मोठय़ा प्रमाणावर जैवविविधता आहे.
अंदमान-निकोबार : हा सर्व बेटांचा प्रदेश असून ही बेटेदेखील जैवविविधतेने संपन्न आहेत.
अतिसंवेदनशील भूप्रदेश
शास्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, जगभरात जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असणाऱ्या भूप्रदेशांची (ज्यांना जागतिक हॉट स्पॉट रिजन म्हटले जाते) संख्या 35 आहे. या प्रदेशांमध्ये अत्यंत दुर्मिळ प्राणी आणि वनस्पतींचे वास्तव्य आहे. या प्रदेशांचे क्षेत्रफळ पृथ्वीवरील एकूण क्षेत्रफळाच्या 1.9 टक्के इतके आहे. याचाच अर्थ भूतलावरील 9 टक्के भूप्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्वाचा आहे. वर उल्लेख केलेल्या 35 प्रदेशांना अतिसंवेदनशील मानण्यामागं तेथील दुर्मिळ जाती-प्रजातींचे कारण आहेच; पण त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपामुळं तेथील जैवविविधता धोक्यात आलेली आहे. तिसरे कारण म्हणजे, या प्रदेशांमध्ये एण्डेनिक वनस्पती आणि प्राण्यांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. या 35 प्रदेशांपैकी दोन अतिसंवेदनशील प्रदेश (ईशान्य रिजन आणि पश्चिम घाट) हिंदुस्थानमध्ये आहेत.
अभ्यासाचा अभाव
2015 मध्ये झालेल्या संशोधनातून ज्या 445 नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे त्यामध्ये 262 प्राण्यांच्या प्रजाती असून 183 वनस्पतींच्या नवप्रजाती आहेत. यामध्ये या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या चार, उभयचर प्राण्यांच्या सहा, रानआल्याच्या तीन आणि अंजिराच्या तीन नवप्रजातींचा समावेश आहे. त्यानंतरही प्राणी आणि वनस्पतींच्या 176 नव्या प्रजाती आढळून आल्या होत्या. मात्र अजूनही या चारही प्रदेशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर सर्वेक्षण करणे, अभ्यास करणे गरजेचे आहे.
‘जैवविविधतेची माहेरघरं’ धोक्यात
पर्यावरणाच्या संतुलनासाठी 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित असणे आवश्यक आहे असे मानले जाते; परंतु हिंदुस्थानात केवळ 20 टक्केच क्षेत्र वनाच्छादित असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे, ही आकडेवारीही फसवी आहे. कारण वन विभागाची जंगलांबाबतची व्याख्याच चुकीची आहे. महाराष्ट्रामध्ये जंगलांची सर्वात जास्त व्याप्ती विदर्भामध्ये आहे. त्यामुळेच ब्रिटिश काळापासून वन खात्याची मुख्य कार्यालये विदर्भात आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जंगलांची व्याप्ती कमी असली तरी पश्चिम घाटामुळे आपल्याकडे जैवविविधता ही खूप अधिक प्रमाणात आहे. हे व्यस्त प्रमाण जगभरात दिसून येते. मात्र वनाच्छादित प्रदेश अधिक असणे हे जैवविविधतेसाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने आज हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात दाट वनांचे प्रमाण घटत चालले असून ते 13 ते 14 टक्क्यांपर्यंत खाली गेले आहे. त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे, जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या जंगलांचे प्रमाण 10 टक्केच राहिलेले आहे. हिंदुस्थानमध्ये दरवर्षी 14 लाख हेक्टरवरील जंगल नष्ट होते असल्याचे काही अभ्यासांमधून दिसून आले आहे. यावरून आपण किती जैवविविधतेचा ऱहास करत आहोत याची कल्पना येते.
(लेखक जैवविविधतेचे अभ्यासक असून वर्गीकरण शास्त्रज्ञ आहेत.)





























































