
>>सुहास मळेकर
आजचा तरुण स्पर्धा आणि वेगाच्या मागे सुसाट धावत चाललाय. स्पर्धा टाळून नवनव्या तंत्रज्ञानातून उपयुक्त ते घ्यायचे आणि नको असलेले दुर्लक्ष करायचे हे त्याने एकदा समजून घेतले तर जगणे सहज सोपे होईल.
‘‘माझ्या मुलाने रागाने तडकाफडकी मोबाईल जमिनीवर आपटला!’’ मित्र सांगत होता.
त्याच्या मुलाच्या मते मोबाईल मंद (स्लो) चालत होता. इतके महिने वापरलेला मोबाईल कदाचित मोबाईलच्याच वाढत असलेल्या वेगवान सेवेमुळे मंद वाटत असेल, पण एकूणच विचार करताना लक्षात येते की, तरुण मुलांची मानसिकता जीवघेण्या स्पर्धेमुळे पुढे पळत सुटलीय.
मोबाईल मंद झालाय वाटतो हे जसे या अतिवेगाच्या मानसिकतेमुळे वाटते तसेच ते वाटल्याबरोबर काहीही विचार न करता रागाने तो जमिनीवर आपटणे ही प्रतिक्रियादेखील त्याच वेगवान मानसिकतेचीच.
आता या वेगवान प्रतिक्रिया खूपच समोर येऊ लागल्या आहेत. एकदा कधीतरी वाचले बापाने मुलावरच्या रागात टीव्हीवर काहीतरी फेकून मारले. किती मोठा फटका? त्यामुळे मुलांवर होणारे संस्कार, परिणाम हा आणखी वेगळा विषय. काहीही विचार न करता पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला मारून संपवणे हेसुद्धा मानसिक वेगानेच घडतेय. नवऱयाने तडक हात उगारणे ही जशी रागाने वेगवान येणारी प्रतिक्रिया तशीच पत्नीने लागलीच घटस्पह्टाची मागणी करणे हीदेखील जलद आणि मागचा पुढचा विचार न करता केलेली क्रिया. हे प्रमाण या वेगवान मानसिकतेमुळे बरेच वाढले आहे.
आपण आपल्या गरजा वाढवत गेलो, नकळत स्पर्धेच्या आणि पर्यायाने मानसिक वेगाच्या गर्तेत गेलो. एखादी स्पर्धा हवीच, पण रोजच्या जगण्यावर तिने अतिक्रमण केलेय. शहरातला वेग ग्रामीण भागात कमी आढळतो म्हणून आरोग्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील माणसे बऱयापैकी सुदृढ आणि स्वस्थ आढळतात. शहरातील माणसे चार दिवस विश्रांतीसाठी जरी अशा ठिकाणी गेली तरी चौथ्या दिवशी त्यांना शहराची ओढ लागते. त्याला कारण असते मनाचा वेग. हा मनाचा वेग सांगत असतो, ‘‘सगळी माणसे पुढे पळताहेत आणि तू थांबला आहेस!’’ जगाबरोबर प्रगती करायची आहे, पण किती आणि कुठपर्यंत पळणार आपण?
मनाच्या अतिवेगामुळे होणाऱया परिणामांवर तितक्याच वेगाने उपचार करणे पुढे कठीण होत जाणार आहे, हा विचारसुद्धा पुढे यायला हवा.
या वेगामुळे नवीन पिढी आक्रमक होत आहे. गरजा वाढतात त्याप्रमाणे नवनवीन शोध लागत आहेत, स्पर्धा वाढत आहे. आपणच आपले व्याप वाढवून घेतो आणि आणखी काहीतरी मिळवत राहू म्हणून त्या गर्तेत जातो. आजचा तरुण स्वास्थ्य हरवून स्पर्धा आणि वेगाच्या मागे सुसाट धावत चाललाय. कदाचित भविष्याचादेखील त्याला विचार नाही. स्पर्धा टाळून नवनव्या तंत्रज्ञानातून उपयुक्त ते घ्यायचे आणि नको असलेले दुर्लक्ष करायचे हे त्याने एकदा समजून घेतले तर जगणे सहज सोपे होईल.




























































