रेल्वेत तीन लाख रिक्त पदे! कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण; अपघातांचे मूळ कारण; रेल्वे मंत्रालयाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण-पूर्व रेल्वेच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा रेल्वे स्थानकाजवळ तीन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात 288 प्रवाशांनी प्राण गमावले असून एक हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात मानवी चूक, सिग्नल यंत्रणेतील त्रुटीमुळे घडल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी त्याचे मूळ कारण रेल्वेतील रिक्त असलेल्या लाखो पदांमध्ये दडले आहे. सध्या रेल्वेत तब्बल 3 लाख 17 हजार पदे रिक्त आहेत, तर नुकत्याच अपघात झालेल्या दक्षिण- पूर्व रेल्वेत 17 हजार 579 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा मोठा ताण असतो. इच्छा नसतानाही जादा तास राबवून घेतले जाते. त्याचा त्यांच्या कामावर परिणाम होत असून असे जीवघेणे अपघात घडत असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

रेल्वेकडून दररोज नियमित आणि विशेष गाडय़ांची संख्या वाढवली आहे. परंतु रिक्त असलेली कर्मचाऱयांची लाखो पदे भरण्याबाबत केंद्रातील मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. रिक्त असलेल्या या पदांमध्ये सुरक्षा विभागातील सर्वाधिक जागा खाली आहेत. त्यापाठोपाठ गँगमन, कीमन, हेल्पर, पॉइंटमॅन, ट्रकमन, मोटरमन यांचा समावेश आहे. दरम्यान, 2017 ते 2022 पर्यंत भारतीय रेल्वेत 1 लाख 78 हजार 544 पदे भरली असल्याची माहिती सरकारकडून दिली जात आहे, मात्र 2019 मध्ये दोन लाख जागेसाठी आरआरबी, आरआरसीची परीक्षा घेण्यात आली आहे. ती भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱयांना आजही 12 तास काम करावे लागत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱयाच्या पत्राकडे दुर्लक्ष

दक्षिण-पश्चिम रेल्वे झोनच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापकांनी 8 फेब्रुवारी रोजी रेल्वे मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हैसूरमधील एका दुर्घटनेचा हवाला देत सिग्नलिंग यंत्रणेत त्रुटी असून त्या दूर करण्याची मागणी केली होती. पण रेल्वे मंत्रालयाने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्यानेच बालासोरचा अपघात झाल्याची चर्चा रेल्वेच्या अधिकाऱयांमध्ये आहे.

विभागनिहाय रिक्त पदे

n मध्य रेल्वे – 28,655
n पूर्व रेल्वे – 3014
n पूर्व मध्य रेल्वे – 1472
n पूर्व किनारपट्टी रेल्वे – 10,043
n उत्तर रेल्वे – 3875
n उत्तर मध्य रेल्वे – 18,509
n उत्तर-पूर्व रेल्वे – 14,074
n ईशान्य सीमा रेल्वे – 15,672
n उत्तर-पश्चिम रेल्वे – 15,184
n दक्षिण रेल्वे – 22,506
n दक्षिण-मध्य रेल्वे – 17,068
n दक्षिण-पूर्व रेल्वे – 17,579
n दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे – 8106
n दक्षिण-पश्चिम रेल्वे – 6619
n पश्चिम रेल्वे – 30,476
n पश्चिम-मध्य रेल्वे – 11,559
n इतर युनिट – 12343