
>> तरंग वैद्य
दोन महान वैज्ञानिक पद्मभूषण डॉक्टर होमी जहांगीर भाभा आणि पद्मविभूषण डॉक्टर पाम साराभाईंच्या आयुष्यावर बेतलेली मालिका…‘रॉकेट बॉईज’. वेब सीरिजच्या नेहमीच्या सर्व पद्धतींना छेद देणारी साधी, सरळ ‘रॉकेट बॉईज’ मालिका इतर मालिकांच्या तुलनेत कुठेही कमी नाही, किंबहुना वरचढच आहे.
वेब सीरिज म्हटलं की, त्याच्या निर्मितीची एक पद्धत आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासोबतच त्यांचे कुतूहल कमी होऊ नये, त्यांना कंटाळा येऊ नये या सर्व बाबींकडे बारीक लक्ष दिले जाते आणि म्हणूनच मालिकेच्या प्रत्येक भागात काही संभ्रमित करणारे, गोंधळवून टाकणारे प्रसंग घातलेले असतात. मुख्य म्हणजे प्रत्येक भागाचा शेवट अशा पद्धतीचा असतो की, प्रेक्षकांच्या मनात ‘आता पुढे काय?’ हा उत्कंठा वाढवणारा प्रश्न आलाच पाहिजे. वेब सीरिजच्या भाषेत याला ‘हूक पॉइंट’ असे म्हणतात. ‘रॉकेट बॉईज’ या सर्व पद्धतींना छेद देणारी साधी, सरळ वेब सीरिज आहे, ज्यात कोंबलेले ‘ट्विस्ट अँड टर्न’ नाहीत की ‘हूक पॉइंट’ नाहीत, पण तरीही ‘रॉकेट बॉईज’ इतर मालिकांच्या तुलनेत कुठेही कमी नाही, किंबहुना वरचढच आहे.
जसं नाव सांगतं की, ही विज्ञान विषयावर बेतलेली मालिका आहे, पण नेमक्या शब्दांत सांगायचे झाले तर ही आपल्या देशातल्या दोन महान वैज्ञानिक पद्मभूषण डॉक्टर होमी जहांगीर भाभा आणि पद्मविभूषण डॉक्टर पाम साराभाईंच्या आयुष्यावर बेतलेली मालिका आहे. खेळाडू, नट, वैज्ञानिक हे पण सर्वसामान्यांसारखेच असतात. कामापलीकडे त्यांचे पण स्वतचे आयुष्य असते, भांडणं असतात, प्रेम असतं, दुःख असतात, पण कामासमोर ते त्यांना न्यून गणतात आणि आपल्या कामाला सर्वतोपरी समजतात आणि म्हणूनच आपण त्यांना ‘महान’ म्हणतो.
डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर पाम साराभाई यांना नावाने सगळेच ओळखतात. शाळेत पाठय़पुस्तकांत या दोघांविषयी जेवढं वाचलं तेवढीच माहिती, पण त्यांना ‘विलक्षण’ का म्हणतात हे ‘रॉकेट बॉईज’ बघितल्यावरच समजतं.
या वेब सीरिजचा पहिला सीझन आठ भागांचा आहे, जो फेब्रुवारी 2022ला सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आणि एक वर्षातच म्हणजे मार्च 2023ला आणखी आठ भाग घेऊन याचा दुसरा सीझन आला. पहिल्या आठ भागांत स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे, ज्यात भाभा आणि साराभाईंच्या मैत्रीसोबत देशप्रेम दाखवलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाला मजबूत करण्यासाठीच्या त्यांच्या जिद्दीसोबत त्यांचे खासगी आयुष्य, पामचे मृणालिनीबरोबरचे प्रेम उलगडले आहे. पुढील आठ भागांत भाभांचे अणुबॉम्ब तयार करण्याच्या दिशेने पाऊल, त्यांचा संशयास्पद दुःखद मृत्यू, डॉ. साराभाईंच्या प्रयत्नांनी देशातले पहिले टीव्ही प्रक्षेपण, इंदिरा गांधींच्या कार्यकाळात पहिली अणु चाचणी हे महत्त्वाचे मुद्दे हळुवारपणे आपल्या समोर मांडले आहेत. इथे डॉ. साराभाईंचे सहायक असलेले अब्दुल कलाम यांचा प्रवासही दिसतो.
स्वातंत्र्य मिळाल्यावर सत्ताधाऱयांवर खूप मोठी जवाबदारी होती देश घडवण्याची. रस्ते बनवायचे, गावागावांत वीज पोहोचवायची, शेतीची कामं करायची आणि इतर राष्ट्रांकडून देशाची सुरक्षा करायची. डॉक्टर भाभा आण्विक प्रकल्प घेऊन आले होते, जेणेकरून संपूर्ण देशात विजेची कमतरता भासणार नाही, तर डॉक्टर साराभाई आपल्या अवकाश प्रकल्पाद्वारे पाऊस, वादळ, झंझावाताची आगाऊ माहिती देणारे तंत्रज्ञान घडवण्याच्या प्रयत्नात होते. हल्ली आपण जी ‘मौसम विभाग की जानकारी’ आगाऊ मिळवतो, त्याचे संपूर्ण श्रेय डॉ. साराभाईंना जाते.
पंतप्रधान नेहरू यांनी डॉ. भाभा आणि पामच्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले आणि अर्थातच ‘बजेट’मधून धनराशीही स्वीकृत करून दिली. पुढे भाभांनी अमेरिका, रशियाप्रमाणे आपणही अणुबॉम्ब बनवला पाहिजे यासाठी पंतप्रधानांचा होकार मिळवला. नेहरूजींच्या पश्चात परिस्थिती बदलली. नवीन पंतप्रधान शास्त्राrजींची मते भिन्न होती. त्यांचा भर रस्ते, पाणी, शेती, शिक्षा यावर अधिक होता. याचा थेट परिणाम डॉ. भाभा आणि डॉ. साराभाईंच्या प्रकल्पांवर झाला, पण त्यांनी कशी हार मानली नाही, कसे शास्त्राrजींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला हे सर्व उत्तम प्रकारे चित्रित केले आहे.
अभिनयाबद्दल बोलायचं तर जिम सरभ हा अभिनेता अक्षरश होमी भाभा जगलाय. भाभांचा मिश्कील स्वभाव, त्यांचे देशप्रेम, आपल्या प्रकल्पाबद्दलचा आत्मविश्वास त्यांनी असा काही दाखवला आहे की, असं वाटतं, आपण डॉ. भाभांनाच बघत आहोत. भाभांच्या स्वभावाच्या विरुद्ध सौम्य स्वभावाचे डॉ. साराभाई ईश्वक सिंगने हुबेहूब उभे केले आहेत. प्रसिद्ध शास्त्राrय नर्तिका मृणालिनीची (पद्मभूषण मृणालिनी साराभाई) भूमिका रेगिना हिने निभावली आहे. नवराबायको दोघे आपापल्या क्षेत्रात विद्वान असले की, खासगी आयुष्यात त्याचे काय परिणाम होतात, घर आणि काम सांभाळताना काय तारांबळ उडते हे या अभिनेत्रीने सहजतेने दाखवले आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दऴ आपल्या प्रत्येकाच्या हृदयात त्यांच्यासाठी एक वेगळे स्थान आहे. देशाचे पूर्वराष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा सुरुवातीच्या काळातील प्रवास बघणे सुखकारक वाटते. अर्जुन राधाकृष्णन कलामच्या भूमिकेत शोभले आहेत.
अमेरिकेची नजर चुकवून वैज्ञानिकांचा मुंबई ते पोखरण प्रवास बघताना आपण नकळत मनात जप करत असतो, सर्व काही नीट होऊ दे. पोखरणमधील देशाची पहिली अणु चाचणी यशस्वी झाल्याचा जेवढा आनंद तेव्हा आणि तिथे झाला होता, तेवढाच आनंद आज बघताना आपल्याऴाही होतो. देशाचे हजारो कोटी आणि स्वतचे हजारो दिवस पणाला लावून रॉकेट तयार करायचे आणि ते अंतराळात स्थिरावणार की नाही, याची धाकधूक. बरं, संपूर्ण देशाची, राज्यकर्त्यांची तुमच्यावर नजर. तरीही जिद्दीने आपले काम करत राहायचे. खूप हिमतीचे काम आहे, जे वैज्ञानिक करत असतात. अशा या विलक्षण लोकांचे काम बघताना ऊर अभिमानाने भरून येतो. ‘रॉकेट बॉईज’ हा एक खूपच वेगळा विषय घेऊन आल्याबद्दल निर्माता, दिग्दर्शकाचे धन्यवाद!
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)





























































