
पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी, मोहरी या परिसरात सोसाट्याचा वारा सुटून अनेक घरांची पडझड झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा सुटल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोहरी आणि डमाळवाडी येथील अनेक घरांच्या छताचे पत्रे उडून गेले. त्यानंतर माणिकदौंडी, कारेगाव, कुत्तरवाडी या भागात हलकासा पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांची वीज खंडित झाली होती.
पाथर्डी शहरातील विजेचा लपंडाव बराच काळ सुरू होता. तालुक्यातील अनेक गावांत 12 तासांहून अधिक वीजपुरवठा खंडित झाला होता. दुपारी उशिरानंतर हा वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सुरळीत करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट पसरल्यानंतर शनिवारी हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे उकड्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यात विजेच्या तारा, घरांचे पत्रे, घरासमोरील पडव्या, जनावरांच्या गोठ्यांचे छत, फळबागा अशा प्रकारच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आता लोकांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे; मात्र पाऊस येण्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळे अनेकदा तालुक्यातील शेती व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.


























































