अवती भवती – कालथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुहास मळेकर

नुकतेच  घराचे रिनोव्हेशन झाले. त्यानंतर काही गोष्टी नव्याने करण्यासह काही जुन्याच वस्तू नव्याने मांडायच्या असे ठरले. आईने केलेल्या जुन्या संसारातील काही माडीवरची भांडीही त्यानिमित्ताने बाहेर आली.  सुनेनं म्हणजे माझ्या पत्नीने ती आवडीने मांडली. आज जेवताना तिने भात  वाढण्यासाठी घेतलेला कालथा बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि मन 50 वर्षे मागे गेले.

आईला जाऊन 20 वर्षे उलटली. त्याकाळी सरसकट मुलांना आईचा धाक असायचा. जेव्हा केव्हा गोष्ट आईच्या हाताबाहेरची असे तेव्हा ‘‘मी बाबांना नाव सांगते थांब’’ या आईच्या धमकीवर प्रकरण संपून जात असे. असे असले तरी प्रत्येक आईची मुलांना शिस्त लावण्यासाठी आपली स्वतःची अशी एक शैली होती.

एका कालथ्याने इतका भूतकाळ सरसर डोळय़ांसमोर तरळून गेला.

आईने हाताळलेला कालथा आज पुन्हा डोळे भरून आणि मनभर गोंजारून उलटसुलट करून पाहिला. ‘‘कालथा टेकीन!’’ या एका वाक्याने आईने आमचं संपूर्ण जीवन घडवलं.

तीन भावंडांपैकी समोरचं फक्त पात्र बदललेलं असायचं.

‘‘निमूटपणे खातोस की…’’

‘‘निमूटपणे अभ्यासाला बसतोस की…’’

भावंडांना प्रत्येकाला हा प्रसाद मिळालेला असला तरी आईने एकाला ‘‘…की कालथा टेकवू?’’ म्हटलं की दुसरा भाऊ चटके देण्यासाठी निरागसपणे कालथा आणून आईच्या हातात देई. तेव्हा आई राग विसरून हसायची आणि हा कालथ्याचा चटका बसण्यापासून कधीकधी सुटका होई.

खरंतर कुणालातरी कुठेतरी भाजलेलं आम्ही पाहिल्यावर ‘‘आईचे ऐकले नाही म्हणून त्याच्या आईने त्याला कालथा टेकवून चटका दिलाय,’’ अशी आईने घातलेली ती भीती होती. जेव्हा जेव्हा आई तव्यात गरम करून कालथा टेकीन म्हणत असे तेव्हा त्या भाजलेल्या मुलाचा हात डोळय़ांसमोर येई.

आजच्या घडीला यातलं काहीच घडणार नाही. मुलांना आईवडिलांनी मारलेलेसुद्धा आता चालत नाही.   केवळ धाकावर जगणारी आमची पिढी आणि आता अकालीच सर्वज्ञान मिळालेली पिढी पाहिली की, तुलना करून उगीच अस्वस्थ व्हायला होतं.