चांदोली धरणात महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांदोली धरणात केवळी एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जून निम्म्यावर आला तरी पावसाने दडी मारली आहे. उन्हाची तीक्रता वाढत चालली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होऊ लागले आहे. पाणीपातळीमध्ये घट होऊ लागली आहे. पिण्याचे पाणी, शेतीसाठी लागणारे पाणी तसेच विविध योजनांमार्फत चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठी 5.18 टीएमसी एवढाच शिल्लक आहे.  त्यामुळे पुढील महिन्यापासून पाण्याची कमतरता मोठय़ा प्रमाणात भासणार आहे.

चांदोली धरण हे 34.40 टीएमसी क्षमतेचे असून, धरणाचा मृतसाठा हा हा 6.88 टीएमसी इतका आहे. चांदोली धरणात सध्या 12.06 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, यातील 5.18 टीएमसी एवढाच पाणीसाठा उपयुक्त आहे.

शिराळा तालुक्यात एकदाही वळवाचा पाऊस पडलेला नाही. वळवाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या वळवाची प्रतीक्षा सोडून पुढे खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. तर बहुतांश शेतकऱ्यांनी मे महिन्यात रोहिणी नक्षत्रावर धूळवाफ भात पेरण्या उरकून घेतल्या आहेत. परंतु आता मे महिना संपला. जून निम्म्यावर आला. मृग नक्षत्र सुरू झाले तरीही पावसाची लक्षणे काही अद्यापि दिसून येत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. निसर्गाचा लहरीपणा व वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक अडचणींवर मात करत बळीराजाने आता निसर्ग आपल्याला साथ देईल, या आशेवर रखरखत्या उन्हाचे चटके सोसत खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे करत आहेत.

तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे पावसाने अचानक सुरुवात केली, तर मशागतीची कामे ठप्प होतील. तसेच, आगाप पेरण्या करता याव्यात पाऊस कधी सुरुवात करेल, याचा नेम नाही. त्यामुळे पेरणी पूर्वमशागतीची शेतातील नांगरट, वाळलेले पाचट, तण वेचणे, शेणखत विस्कटणे, बांध घालणे आदी कामांची धांदल सध्या शिवारात सुरू आहेत. शेतशिवार माणसाने  फुलून गेली आहेत. मात्र, अद्यापि पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, शिराळा शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरणा धरणानेही सध्या तळ गाठला असल्याने शिराळावासीयांच्या डोक्यावर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे.

तालुक्यात एकूण होणारी पेरणी

– शिराळा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 63 हजार 410 हेक्टर असून, त्यापैकी पिकाखालील क्षेत्र 37 हजार 852 हेक्टर आहे. यामधील चालूवर्षी 29 हजार 130 हेक्टरमध्ये पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक 13 हजार 613 हेक्टरमध्ये भातपिकाची पेरणी होण्याची शक्यता आहे. तर 2 हजार 205 हेक्टरमध्ये ज्वारी, 1 हजार 262 मका, नाचणी, इतर तृणधान्य, भुईमूग 1 हजार 133, सोयाबीन 2 हजार 500 आदी पिकांसह या पेरण्या होणार आहेत.