निमित्त – पितृ देवो भव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अरुणा सरनाईक

पाश्चात्त्य देशातील एका पतीने पत्नीच्या पश्चात आपल्या तीनही मुलींचा सांभाळ आईच्या मायेने केला. त्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  ‘फादर्स डे’ म्हणून साजरा करावा असा आग्रह या मुलीने धरला. तिच्या भावनांचा आदर करीत अमेरिकन सरकारने तिला परवानगी दिली आणि या दिवसाची सुरुवात झाली.  भावना, कृतज्ञता व्यक्त करायला देश, भाषा आड येत नाहीत. भावना या नेहमी सर्वव्यापी, देशव्यापी असतात. प्रेम शरीर मर्यादांच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी होतं हेच खरंय!

आपली संस्कृती ‘मातृ देवो भव! पितृ देवो भव! गुरू देवो भव!’ असं सांगते. आपल्यासाठी या तीनही व्यक्ती देवस्थानी आहेत. जे आपल्याला जन्म देतात किंवा ज्यांच्यामुळे आपण या जगात आलेलो आहोत, त्यांच्याविषयी कायमच ऋणी राहणे, कृतज्ञता व्यक्त करणे किंवा कायमस्वरूपी कृतज्ञ राहणे हीच आपली शिकवण आहे. यासाठीच मदर्स डे, फादर्स डे, गुरुपौर्णिमा यांसारख्या दिवसांचे महत्त्व आजही कायम आहे. आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने मनात विविध प्रकारच्या भावनांचा कल्लोळ दाटला आहे.  खरंच का? फक्त एक दिवस उत्साहात साजरा करून बाकीचे दिवस काय? हा विचार करणे गरजेचे आहे. आवर्जून सांगावेसे वाटते की, आपल्या मातापित्यांचे स्मरण मनात सतत जागृत ठेवावे ही भावना केवळ 19 जून या दिवसापुरती मर्यादित न ठेवता सर्व दिवसव्यापी असावी. अर्थात हाही दिवस आठवणीने साजरा करणाऱया नवीन पिढीचे विशेष कौतुकच आहे!

पाश्चात्त्य देशातील एका मुलीने हा दिवस साजरा करण्याची परवानगी मागितली होती त्याच्यामागे एक खास कारण होते. त्या मुलीला तीन बहिणी होत्या. तिच्या जन्मानंतर काही दिवसांतच तिच्या आईचे निधन झाले. आईच्या पश्चात तिच्या वडिलांनी त्या तीनही मुलींचा सांभाळ आईच्या मायेने केला. ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वडिलांचा वाढदिवस ‘फादर्स डे’ म्हणून साजरा करावा असा आग्रह तिने धरला. तिच्या भावनांचा आदर करीत अमेरिकन सरकारने तिला परवानगी दिली. तोच हा दिवस! असं म्हणतात, भावना, कृतज्ञता व्यक्त करायला देश, भाषा आड येत नाहीत. भावना या नेहमी सर्वव्यापी, देशव्यापी असतात. त्यामुळेच ‘फादर्स डे’ सर्व जगात साजरा केला जातो. तसे पाहू जाता बंधुत्व भावनेनं जर सर्वांनी राहायचे ठरवले तर वर्षाचे सारे 365 दिवस उत्साहाचे, समारंभाचेच होऊन जातील.

आई बाळाला 9 महिने पोटात वाढवते, तिच्या कष्टाला कोणतीच उपमा नाही, पण आज वडीलसुद्धा आईच्या बरोबरीने बाळाची काळजी घेतांना दिसून येतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये या प्रकारचा अनुभव मी नेहमीच घेत असते. बाळाचे आईवडील एकमेकांची घेत असलेली काळजी कौतुकास्पद असते. बाळ तिच्या पोटात वाढतंय, जरा काही कमी जास्त झालं, जरा वेदना झाली तर त्याचे प्रतिबिंब बाळाच्या बाबाच्या चेहऱयावरदेखील दिसतं. हे असं एकमेकांत गुंतलेपण बघण्यात एक आनंद असतो. शरीर आणि मानसिक एकत्व ही आजच्या तरुणाईनं जपलेली धरोहर आहे. बाळाचे आगमन ते जन्मोत्सव मोठय़ा आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. अशा वेळी आई श्रेष्ठ की बाबा? असा प्रश्नच उद्भवत नाही. आई इतकेच वडीलही श्रेष्ठ असतात. जशी बाबाविना आई मुलांना त्यांची उणीव भासू देत नाही, प्रसंगी ती दोन्ही भूमिका उत्तम प्रकारे पार पाडते. तसेच वडीलसुद्धा प्रसंगी मुलांची आई होऊ शकतात, तितक्याच प्रेमाने मुलांचा सांभाळ करू शकतात. प्रेम शरीर मर्यादांच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी होतं हेच खरंय!

आपल्याकडे पित्यांनी जसा मुलासाठी त्याग केला तसेच कित्येकदा मुलांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व सुखांचा त्याग केलेला आहे. राजपुत्र देवव्रत हा त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्या काळी ‘फादर्स डे’ हा शब्द नव्हता, पण त्याने जो त्याग केला, त्याला आपल्याला असं म्हणता येईल की, भीष्म यांनी आजन्म ‘फादर्स डे’ साजरा केला. राजा ययातीचा मुलगा पुरू यानेदेखील आपले तारूण्य पित्याला देऊन त्याचे वृद्धत्व घेतले. हा पितृत्व ऋणातून मुक्त होण्याचा मोठा प्रसंग आहे. राजा दशरथाचा वचनभंग होऊ नये म्हणून श्रीरामांनी वनवास पत्कारला. ही सारी उदाहरणे पित्यावरील अपार प्रेमाचीच आहेत ना? म्हणूनच म्हणतात ना, माता-पित्याचे ऋण फेडू म्हणता फिटत   नाहीत. हा जरी जुना जमाना झाला तरी भावना, कृतज्ञता कधीच जुन्या होत नाहीत. त्या नित्यनवीन, अपरिवर्तनीय आहेत. प्रकटीकरण वेगवेगळे जरूर राहील, पण अर्थाचा मूल गाभा बदलत नाही.

पण आज जग बदलतंय, व्यवहार बदलत आहेत. वाहत्या प्रवाहाचा रोख बदलतो आहे. जीवनमान यंत्रिक होऊ लागलंय! मनात असलं तरी बऱयाचदा वेळ नसल्यामुळे काही गोष्टींवर बंधनं आलेली आहेत. घरचं एक तरी मूल परदेशात असतं अशी आजची स्थिती आहे. अशा वेळी खूप पंचाईत होते, पण मोबाइल, इंटरनेट यांच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. म्हणूनच मग या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं! मध्यंतरी नाना पाटेकरांचा ‘माणूस’ हा चित्रपट पाहिला. बाप आणि मुलाचं नातं दाखविणारा तो चित्रपट होता. त्यातील एक डायलॉग आजही मनात रूतून बसला आहे… “बापाला कधी शेवटचा शिवलास रे!” अतिशय पोटतिडकीने तो विचारतो. “स्पर्श केलास का?” असं नाही, तर “शिवलास का?” प्रखर आहे, पण सत्य आहे. धावपळीच्या जीवनात असे क्षण कधी येतात? कधीतरी सहजच वडिलांच्या हातावर हात ठेवून आपण बसलो आहे किंवा आईच्या मांडीवर डोकं ठेवलंय! तिच्या वृद्ध हातांचा खरखरता स्पर्श संध्याकाळी कधी अनुभवलाय?  नाही घडत आजकाल असं नाही. आज आपण आपल्या आईवडिलांपासून तसंच आपल्या मुलांपासूनदेखील दूर होतोय. म्हणूनच आता विचार करू नका. ‘फादर्स डे’ ला हे सर्व संपवून टाका. आपल्या आईवडिलांना एक अख्खा दिवस गिफ्ट द्या. पूर्ण वेळ त्यांच्या सोबत घालवा. अशासाठीच या दिवसांचे प्रयोजन असतं. त्याचा फायदा घ्या. ज्यांना वडील आहेत, ज्यांना आई पण आहे… जमा करून ठेवा हा स्वर्गीय ठेवा. त्यांच्या स्पर्शातून मिळणारी आपुलकी, प्रेमभावना पुढच्या आयुष्यात शिदोरी ठरेल. ‘त्या हृदयीचे या हृदयी’ अशी अवस्था जाणून घ्या. पहा, केवळ एक दिवसच नव्हे, तर आयुष्य सर्वांगसुंदर झाल्याची अनुभूती येईल.