
उत्तर प्रदेशच्या कॉल सेंटरमध्ये मुंबईकरांच्या नावाची सिमकार्ड असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी कारवाई करून शेरू चौहान या एजंटला पोलिसांनी अटक केली.
तक्रारदार हे एका मोबाईल सुविधा पुरवणाऱया कंपनीमध्ये काम करतात. जूनच्या पहिल्या आठवडय़ात डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशन विभागाकडून कंपनीला मेसेज आला. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. त्या कॉल सेंटरमध्ये फोनसाठी लागणारे सिमकार्ड हे मुंबईतून पुरवल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कंपनीने डेटाचे विश्लेषण केले. तेव्हा 8 एजंटने 123 सिमकार्ड हे विक्री केल्याचे उघड झाले. कंपनीच्या एजंटने जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात एजंटने ती कार्ड विक्री केली होती. एजंट हे ग्राहकाकडून आधारकार्ड, पॅनकार्ड घेतल्यावर त्याचे बायोमेट्रिक करत असायचे. त्यानंतर एकाच व्यक्तीच्या नावाने तीन सिमकार्ड ऑक्टिव्ह करायचे. तीनपैकी एक ग्राहकाला तर दोन उत्तर प्रदेशला पाठवून देत असायचे.



























































