फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न किती वेळ ताजे राहते ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्वी फ्रीज फक्त एक सुखसुविधा होती. मात्र आता ती गरज झाली आहे. भाज्या, फळं, दूध ठेवण्यासोबत फ्रीजमध्ये आपण उरलेले अन्नदेखील सहज ठेवतो. फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न नेमकं किती तास टिकते आणि किती वेळानंतर ते मुळीच खाऊ नये हे जाणून घ्या.

फ्रीजमधील अन्न किती काळानंतर खाऊ नये?
अन्नपदार्थ उरले की आपण ते सहज फ्रीजमध्ये ढकलून देतो. मात्र प्रत्येक पदार्थ खराब होण्याची एक विशिष्ठ वेळ असते. त्यामुळे असे पदार्थ फ्रीजमध्येही खराब होऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ बाहेर काढल्यावर गरम न करता खाऊ नका. शिवाय गरम करण्यासाठी ते फ्रीजमधून थेट गॅसवर ठेवू नका. पंधरा ते वीस मिनिटे ते सामान्य तापमानाला आल्यावर गरम करा. जर तुम्हाला गव्हाची पोळी, पराठा फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर तो एका दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे. एका दिवसापेक्षा जास्त वेळ गव्हापासून बनवलेली पोळी अथवा पराठा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक घटक खराब होतात. ज्यामुळे तुम्हाला पोटांच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
डाळ आणि कडधान्यांची उसळ जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली असेल तर ती देखील दोन दिवसांच्या आत खावी. कारण दोन दिवसानंतर डाळ आणि भाज्यांमध्ये गॅस निर्माण होतो ज्यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्या होऊ शकतात.
फ्रीजमध्ये जर तुम्ही शिळा भात ठेवला असेल तर तो कमीत कमी दोन दिवसांच्या आत संपवा. कारण त्यानंतर तो भात खाणं तुमच्या आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही.
कापलेली अथवा चिरलेली फळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर ती काही तासांमध्ये संपवा. कारण फळ कापल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे लवकर खराब होते. पपई, सफरचंद तर फ्रीजमध्ये जास्त काळ मुळीच स्टोअर करू नये. एका दिवसाच्या आत चिरलेली फळं खाणं हाच यावर एक योग्य उपाय आहे.
जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ, फळं आणि भाज्या जास्त काळ फ्रेश राहाव्या असं वाटत असेल तर कच्च्या फळ अथवा भाज्यांसोबत शिजवलेल्या भाज्या, दूध असे पदार्थ ठेवू नका. कारण कच्च्या फळ आणि भाज्यांवरील जंतू तुमच्या शिजलेल्या पदार्थांना दूषित करू शकतात.
फ्रीजमध्ये फळं आणि भाज्या देखील एका ठराविक काळासाठीच स्टोअर करून ठेवा. कारण प्रत्येक फळ आणि भाजीचा टिकण्याचा एक ठराविक कालावधी असतो. त्यानंतर असे पदार्थ खराब होतात आणि इतर पदार्थ अथवा वस्तूंना दूषित करतात.

भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स
फ्रीजमध्ये फळं आणि भाज्या टिकवून ठेवण्यासाठी ते व्यवस्थित साठवून ठेवायला हवे. नाहीतर जास्त दिवस ठेवल्यानंतर फळं आणि भाज्या ओलाव्यामुळे खराब होतात. यासाठीच जास्तीत जास्त दिवस भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये टिकवण्यासाठी सोप्या टिप्स.

फ्रीजमध्ये कशा साठवून ठेवाव्या भाज्या आणि फळं
आजकाल फ्रीजमध्ये खूप वेगवेगळे प्रकार मिळतात. डबल डोअर, ट्रिपल डोअर आणि चक्क कपाटाएवढे मोठे अवाढव्य फ्रीजदेखील आजकाल सर्वांकडे असू शकतात. या फ्रीजमध्ये कोणत्या गोष्टी कुठे ठेवाव्या यासाठी वेगवेगळे सेक्शन असतात. जसं फ्रीजच्या जवळचा भाग हा डेअरी प्रॉडक्ट ठेवण्यासाठी असतो. फ्रीजचे तापमान या निरनिराळ्या भागात निरनिराळ्या पद्धतीने नियंत्रित करता येते. मासे अथवा मटण नेहमी फ्रीजरमध्ये साठवले जाते. त्याचप्रमाणे भाज्या आणि फळं ठेवण्यासाठी निरनिराळे रॅक असतात. ज्यामुळे तुम्ही सतत फ्रीजचा दरवाजा उघडला तरी त्या ठिकाणचे तापमान नियंत्रित राहते.

भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत
शक्य असल्यास फळं फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजच्या बाहेरच ठेवावी. मात्र काही फळं जी लवकर खराब होतात जसं की कलिंगड, पपई, स्टॉबेरी तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. मात्र सर्व फळांचं पॅकिंग वेगवेगळं असावं. कारण प्रत्येकाची पिकण्याची प्रोसेस वेगवेगळी असते. भाज्या स्वच्छ निवडून, धुवून, सुकवून मगच फ्रीजमध्ये ठेवाव्या. ज्यामुळे त्या जास्त काळ टिकू शकतात. कोथिंबीर अथवा पालेभाज्या मुळांसकट फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या ओलाव्यामुळे लवकर खराब होतात.

फ्रीजचे तापमान नियंत्रित करा
फ्रीजमध्ये वेगवेगळ्या सेक्शनचे तापमान नियंत्रित करण्याची सोय असते. त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये कोणतं सामान ठेवलं आहे आणि त्याला किती तापमानाची गरज आहे यावरून ते व्यवस्थित सेट करा. कारण पालेभाज्या ठेवलेल्या भागाचं तापमान अती कमी असेल तर थंडाव्यामुळे त्या लवकर खराब होऊ शकतात. पालेभाज्या नेहमी एखाद्या हवेशीर बॉक्स अथवा डब्ब्यात सुती कापड अथवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्या. ज्यामुळे अतिरिक्त ओलावा कापड अथवा टिश्यू शोषून घेऊ शकतो. शिवाय त्यातील कापड अथवा पेपर सतत बदलत राहावा.

फळं अथवा भाज्या कधीच प्लास्टिकच्या हवाबंद पिशव्या अथवा डब्यात ठेवू नका.
भाज्या आणि फळं एकत्र साठवून ठेवू नका असं केल्यास त्या लवकर सडतात.
कंदमुळे साठवून ठेवण्यापूर्वी त्याच्या देठाकडचा भाग कापून मग त्या साठवून ठेवा.
नाजूक फळं जसे की स्टॉबेरी, ब्लू बेरी, अंजीर अथवा टोमॅटो सारख्या भाज्या एकमेंकांवर ठेवू नका.
एखादी भाजी अथवा फळं खराब झालं तर ते लगेच इतर भाज्या आणि फळांपासून वेगळं करा नाहीतर त्यामुळे इतर भाज्या अथवा फळं खराब होतात.