
>> रश्मी वारंग
नावात काय आहे? या शेक्सपिअरच्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नसलं तरी नावातून ओळख तयार करणाऱया पदार्थांत गुलाबजाम अव्वल आहे. या पदार्थाला हे नाव का बरं मिळालं याची ही रसदार कहाणी.
गुलाबजाम मूळचे कुठले? याबद्दल अनेक शक्यता वर्तविण्यात येतात. काहींच्या मते ही हिंदुस्थानी पाककृती आहे, तर काहींच्या मते पर्शियन. काहींनी या गुलाबजामच्या शोधाचं श्रेय मुघलसम्राट शाहजहानला दिलं आहे. अरबी मंडळींची ‘लुक्मत-अल-कादी’ नामक गोड पदार्थाची पाककृती गुलाबजामशी मिळतीजुळती आहे, पण त्यासाठी वापरण्यात येणारे घटक पूर्ण वेगळे आहेत.
पर्शियन पाककृतींमध्ये गुलाब, गुलाबपाणी यांचा मुबलक वापर होत असे. गोल (फूल) आणि आब (पाणी). अर्थात, गुलाब हा शब्दही पर्शियन आहे. पूर्वीच्या काळी मैद्याचे छोटे गोळे तुपात तळून ते मधात किंवा साखरेच्या पाकात मुरवून खाल्ले जात आणि या मधात किंवा साखरपाकात स्वादासाठी गुलाबपाकळय़ा मिसळल्या जात. त्यातून गुलाब हा शब्द या पदार्थात आला. मग जाम, जामून का म्हटलं गेलं? तर मध्ययुगीन हिंदुस्थानात जामून अर्थात, जांभूळ हे लोकप्रिय आणि सहज प्राप्त होणारं फळ होतं. या जांभळाच्या झाडांच्या संख्येवरूनच हिंदुस्थानला ‘जंबूद्विप’ म्हटलं जाई. त्या जांभळांची लोकप्रियता लक्षात घेता या मैद्याच्या गोळय़ांना जांभळासारखा आकार दिला गेला आणि त्यातून जन्माला आला शब्द ‘गुलाबजाम.’
गुलाबजाम केवळ आपल्याकडेच नाही, तर नेपाळ, मालदीव, पाकिस्तान, बांगलादेशमध्येही लोकप्रिय आहेत. मात्र इथे तो वेगवेगळय़ा नावांनी ओळखला जातो. नेपाळमध्ये तो ‘लालमोहन’ आहे. तिथल्या तिहार, दशैन अशा उत्सवांत गुलाबजामचा मान मोठा आहे. बांगलादेशात हाच गुलाबजाम ‘पंतुआ’म्हणून खाल्ला जातो, तर मालदीवमध्ये तो ‘गुलाब की जानू’ आहे.
गुलाबजाम हा हिंदुस्थानी संस्कृतीमधील मध्यस्थ दुवा आहे. ईद-उल-फीत्र असो किंवा दिवाळी गुलाबजाम भाव खातो. आज केशर, खस यांचा गुलाबजामच्या साखरपाकात स्वादासाठी वापर केला जातो. तरी तो केशरजाम होऊ शकत नाही. गुलाबाचा स्वाद मागे पडला आहे तरी नावातून गुलाब जाऊ शकत नाही. नावात काय आहे? याचं उत्तर इथे कदाचित मिळतं. रसदार पाकातून सचैल मधुर स्नान करून ओघळत्या रसासह मुखात विसावणारा हा गुलाबजाम म्हणजे गुलाबी जामुनी स्वादाचा घट्ट-मिट्ट गोलाकार आनंदघनच!
कालाजामून की, लेडीकेनी
गुलाबजाम सर्वत्र लोकप्रिय आहे हे खरं, पण आपल्या देशात त्याच्यावर विविध प्रयोग झालेले दिसतात. गुलाबजामचा भाऊ कालाजामून आपल्याला माहीत असतो. बंगालमध्ये ‘लेडीकेनी’ हा गुलाबजामसारखाच पदार्थ लोकप्रिय आहे. ब्रिटिश काळात ‘भीमचंद्र नाग’ या कोलकत्यातील सुप्रसिद्ध मिठाईवाल्याने लॉर्ड पॅनिंग यांची पत्नी लेडी शार्लेट पॅनिंग यांच्या भेटीप्रित्यर्थ गुलाबजामसारखाच, पण थोडा वेगळा पदार्थ छेनापासून तयार केला आणि लेडी पॅनिंग यांच्यावरून या पदार्थाला नाव दिले, ज्याचा अपभ्रंश म्हणजे ‘लेडीकिनी.’ राजस्थानात तळलेले मैद्याचे गोळे पाकात टाकण्याऐवजी टोमॅटो, मसाले वापरून चक्क ‘गुलाबजामून की सब्जी’ बनवतात.
























































