रेशन दुकानांमध्येही मिळणार बँका, पोस्टाच्या सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेशन दुकानांवर आता फक्त रेशनच नव्हे तर राष्ट्रीयीकृत बँका आणि टपाल खात्याच्या सेवाही जनतेला उपलब्ध होणार आहेत. राज्यातील सुमारे 50 हजार रेशनिंग दुकानांमधून या सेवांचा लाभ घेता येणार आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याची माहिती या विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राष्ट्रीयीकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, दूरसंचार मंत्रालय, खासगी बँका आदी नागरी सेवा राज्यातील सर्व रेशनिंग दुकांनामधून देण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

आधार कार्डमध्ये दुरुस्तीही होणार

आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाहीही रेशनिंग दुकानांमधून केली जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. या सेवा देण्यासाठी बँका आणि टपाल खात्याचे प्रतिनिधी रेशनिंग दुकानांमध्ये नियुक्त केले जाणार आहेत. रेशनिंग दुकानदारांनाही त्याचा मोबदला दिला जाणार आहे. रेशनिंग दुकानदारांना आपल्या दुकानांची भाडी परवडेनाशी झाली असल्याचे त्यांना आर्थिक मेळ जमवणे कठीण झाले आहे. या सेवांच्या माध्यमांतून त्यांचे उत्पन्न वाढवण्याचाही हेतू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.