
पाऊस पडत नसल्याच्या विवंचनेतून शेतकर्याने स्वतःच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव कोलते येथील शिवारातील घटना आज 23 जून रोजी घडली आहे. रमेश त्रिंबक सोनवणे (40) असे आत्महत्या करणार्या शेतकर्याचे नाव आहे. दरम्यान मयत शेतकरी यांचे शवविच्छेदन करण्यासाठी हसनाबाद ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी नसल्याने तीन तास मृतदेह वाहनात पडून होता. त्यामुळे नातेवाईकांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर चांगलाच संताप व्यक्त केला.
रमेश सोनवणे हे रात्री जेवण केल्यानंतर कुणाला काही न सांगता शेतात निघून गेले होते. ते रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या आईने व नातेवाईकांनी गावात त्यांचा शोधा घेतला. यानंतर त्यांना कुठलीच माहिती मिळत नसल्याने गावातील नागरिकांनी सकाळी त्यांची शोधाशोध केली. या दरम्यान त्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ग्रामपंचायत सरपंचानी घटनेची माहिती तात्काळ हसनाबाद पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढून घटनेचा पंचनामा करत मृत्यूची नोंद केली आहे. जून महिन्याचे तीन आठवडे उलटून ही पाऊस पडत नसल्याने हात उसने आणि नातेवाईक यांच्याकडून घेतलेल्या पैशात घेतलेले महागडे बी-बियाणे आणि खत त्यांनी भरून ठेवली होती. वेळेत पाऊस न पडल्याने वेळेत पेरणी न झाल्याने पैसे फेडायचे कसे? या चिंतेत ते असल्याची माहिती नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिली आहे. याचं विवेचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. रमेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील शेतकरी रमेश त्रंबक सोनवणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हसनाबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणला असता तेथे शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे प्रेत दवाखान्यासमोर गाडीत तीन तास पडुन होते. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. जेहुरीकर यांना विचारले असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. मी काय करू, हसनाबाद परिसरात अशा घटना नेहमीच घडतात, असे उत्तर दिले. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तळेगाव विभागप्रमुख रामसिंग सोळुंके यांनी सांगितले असून आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.


























































