
गेल्या काही तासांपासून मुंबई व आसपासाच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरातील पिंपळाचे झाड कोसळले असून हे झाड अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कौशल महेंद्र दोषी (33) असं त्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे 35 फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. बुधवारी पहाटे कौशल दोषी शौचालयात गेला असता त्याच्या अंगावर हे झाड कोसळले. झाडाचा बुंधा डोक्यावर पडल्यामुळे कौशल याचा जागीच मृत्यू झाला.



























































