
विलेपार्लेतील कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलाला सकाळी भलामोठा पंटेनर धडकल्याची घटना घडली. हा पंटेनर हाइट बॅरियर ओलांडण्याच्या प्रयत्नात पुलाखाली अडकून पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे चार ते पाच तास बंद होती. तर पुलाला धक्का बसल्याने पुलावरील वाहतूकही सुमारे दोन तास बंद होती. दरम्यान, पालिकेकडून पुलाची तातडीने पाहणी करण्यात आली असता पुलाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या कंटेनरचा वेग इतका जास्त होता की ‘हाईट बॅरियर’ अक्षरशः मोडून पडले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेनंतर पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालय, पूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मुंबई पोलीस, मुंबई वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्याची कार्यवाही सुरू केली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. महानगरपालिका प्रशासनाने गॅसकटरच्या सहाय्याने हाईट बॅरियरचे भाग वेगळे केले. या कंटेनरच्या धडकेमुळे पुलासाठी लावलेल्या ‘हाईट बॅरियर’चे नुकसान झाले असले तरी पुलाच्या संरचनेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे पुलाला कोणताही धोका नसून पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. कंटेनर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच संबंधित कंटेनर चालकावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.



























































