
>> प्रसाद ताम्हणकर
विमानांमध्ये डुक्कर, गुरेढोरे आणि कोंबडय़ांच्या चरबीपासून तयार केलेले इंधन वापरण्यात येते. कमी कार्बन फूटप्रिंटमुळे विमानाच्या इंधनात त्याचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत फायद्याचा आहे असे मानले जाते. एका अभ्यासानुसार, 2030 पर्यंत इंधन बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीची मागणी आजच्या तिप्पट होण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा तयार केलेल्या इंधनाचा सर्वात जास्त हिस्सा हा विमान कंपन्यांकडून वापरला जाणार आहे. विमान कंपन्यांवर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर दबाव आहे. अशा वेळी जिवाश्म इंधनाचा वापर कमी करून ‘ग्रीन इंधन’ वापरावर त्यांचा भर जास्त असेल.
ग्रीन इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे प्राण्यांच्या चरबीचा पुरवठा कमी होणार आहे. अशा वेळी विमान कंपन्या सोडून जे इतर उद्योग यावर अवलंबून आहेत, त्यांना दुसरा पर्याय शोधावा लागेल. अर्थात हा पर्याय म्हणजे पाम तेल असणार आहे. म्हणजेच एका प्रकारे पाम तेलाच्या वाढत्या वापराला विमान उद्योग अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरणार आहे. सध्या जगभरात वाढलेल्या कार्बन उत्सर्जनाला पाम तेलाचा अतिवापर हे एक मुख्य कारण मानले जात आहे. ब्रुसेल्समधील ‘ट्रान्स्पोर्ट अॅंड एन्व्हायर्नमेंट’ या स्वच्छ वाहतूक अभियानामध्ये आपल्या अभ्यासात सांगितले आहे की, विमान कंपन्यांची मागणी पूर्ण केली जाईल इतके प्राणी रोज मारले जात नाहीत. मुख्य म्हणजे प्राण्यांच्या चरबीचा स्रोत हा अमर्यादित नाही.
खूप पूर्वीपासून प्राण्यांच्या चरबीचा वापर हा विविध उद्योगांत केला जात आहे. सौंदर्यप्रसाधने, साबण, मेणबत्त्या अशा विविध उद्योगांत त्याचा वापर होतो. गेल्या काही वर्षांपासून बायोडिझेलचा वापर वाढत चालला आहे. ब्रिटनमध्ये तर हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. एका अभ्यासानुसार, 2006 पासून संपूर्ण युरोपमध्ये प्राण्यांच्या चरबीपासून इंधनाच्या उत्पादनात अनेक पटींनी वाढ झाली आहे. या इंधनातील एक मोठा हिस्सा ट्रक आणि कारमध्ये बायोडिझेल म्हणून वापरला जातो.
आता युरोप आणि ब्रिटन आपल्या विमान क्षेत्राला स्वच्छ इंधन मिळावे म्हणून त्यातील जास्तीत जास्त हिस्सा वापरण्याचा विचार करत आहे. त्यासाठी काही नियमदेखील बनवले जाणार आहेत. त्यानुसार विमान कंपन्यांना त्यांच्या इंधनात अशा एल्staग्हंत Aन्ग्atग्दह इलत् (एAइ)चे प्रमाण वाढवावे लागणार आहे. 2030 पर्यंत हे प्रमाण ब्रिटनमध्ये 10 टक्के आणि युरोपमध्ये 6 टक्के असणार आहे. मात्र त्यामुळे चरबीच्या उद्योगावर प्रचंड दबाव पडणार आहे. मुख्य म्हणजे मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीतदेखील वाढ होणार आहे.
‘ट्रान्स्पोर्ट अॅंड एन्व्हायर्नमेंट’च्या सांगण्यानुसार पॅरिस ते न्यूयॉर्कला जाण्यासाठी विमानाला लागणारे इंधन हे 8,800 डुकरांच्या चरबीएवढे आहे. युरोपियन युनियनमधील विमान कंपन्यांना 2030 पर्यंत 6 टक्के स्वच्छ किंवा ग्रीन इंधन वापरावे लागेल, त्यापैकी 1.2 टक्के ई-केरोसिन असेल. उर्वरित 4.8 टक्के हे प्राण्यांच्या चरबीतून मिळेल असे गृहीत धरले, तर प्रत्येक ट्रान्सअटलांटिक उड्डाणासाठी 400 डुकरांची चरबी आवश्यक असेल. विमान वाहतूक क्षेत्राने प्राण्यांच्या चरबीचा अधिक वापर केल्यास, ज्या उद्योगांवर सर्वाधिक परिणाम होतो त्यामध्ये पाळीव प्राण्यांचे खाद्य उत्पादन करणाऱया उद्योगाचा प्रमुख समावेश असेल. सध्या हे उत्पादक ब्रिटनमध्ये 3.8 करोड पाळीव जनावरांसाठी खाद्य उत्पादन करतात आणि त्यासाठी प्राण्यांच्या उच्च दर्जाच्या चरबीचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात.
हिंदुस्थानचा विचार केल्यास हरित ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी देशात राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला सुरुवात करण्यात आली आहे. 2047 पर्यंत देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचे या मिशनचे उद्दिष्ट आहे. ग्रीन हायड्रोजन हा स्वच्छ ऊर्जेचा एक स्रोत आहे. हा ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी इलेक्ट्रोलायझरचा वापर करून पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातात. या प्रािढयेसाठी रिन्युएबल ऊर्जेचा (अक्षय ऊर्जा) वापर होत असल्याने याचा उत्पादन खर्चदेखील कमी आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे सध्या जगभरातील अनेक प्रमुख तेल आणि गॅस उत्पादन करणाऱया कंपन्या त्याच्यात स्वारस्य दाखवत आहेत.





























































