
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पक्षाच्या दोन गटामध्ये राडा झाला आहे. छगन भुजबळ समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा ताबा घेतल्याने शरद पवार समर्थकही कार्यालयाबाहेर जमा झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटामध्ये वादावादी सुरू झाली आहे. दंगल नियंत्रण पथकासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व बंडखोर गटाचे समर्थक आपआपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनार्थ मंगळवारी दुपारी एक बैठक नाशिकमधील पक्षाच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी शरद पवार यांचे समर्थक जमा होणार होते. मात्र त्याआधीच बंडखोर छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी या कार्यालयाचा ताबा घेतला. याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक कार्यालयाबाहेर जमा झाले. त्यामुळे दोन्ही गट आमने सामने आले.
”सत्तेचा किती दुरुपयोग केला जातो ते इथे दिसतंय. हे कार्यालय काँग्रेस वेल्फेअर फाऊंडेशनचे आहे. त्यामुळे यावर शरद पवार यांच्या समर्थकांचाही हक्क आहे. आमच्याकडे अधिकृत बैठक घेण्याच्या परवानगीचे पत्र असतानाही पोलीस आम्हाला कार्यालयात जाऊ देत नाहीए”, असे शरद पवार यांच्या समर्थकांनी सांगितले.
























































