
>> मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज
विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘शोबीज टेल्स’ची दणक्यात सुरुवात झाली आहे. नव्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या कार्यक्रमाला ‘धडाकेबाज’ स्टार महेश कोठारे यांची एंट्री झाली.
गणेश अचवल यांनी कोठारे यांची मुलाखत घेतली. तत्पूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. डोके व उपप्राचार्य चंदना चक्रबोर्ती यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी कोठारेंना सुंदर चित्र भेट दिले. कोठारेंनी मुलाखतीत त्यांचा ब्लॅक ऍण्ड व्हाईट सिनेमापासून डिजिटल सिनेमापर्यंतया प्रवास उलगडला. हिंदी चित्रपटापासून ते मराठी चित्रपट, टेलिव्हिजन मालिकापासून ते वेबसीरिजपर्यंतचा ‘थरथराट’ त्यांनी सांगितला.
कोठारे म्हणाले, आयुष्यात मला अपयशालाही सामोरे जावे लागले, पण मी कधीही थांबलो नाही. आईबाबा व त्यांच्या पत्नीने कायम साथ दिली. मुलाखतीत त्यांनी अण्णासाहेब देऊळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या. ‘तात्या विंचू’ हे पात्र पिढय़ान्पिढय़ा लोकप्रिय आहे, असे सांगतानाच त्यांनी त्यांच्या चित्रपटांची नावे पाच अक्षरी कशी असतात तसेच त्यातील पॅरेडी साँग्ज यावर भाष्य केले.




























































