
गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे बट्टय़ाबोळ झाला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नगर शहरामध्ये कचऱयाचे ढीग लागले असून, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. उपनगर भागामध्ये घंटागाडय़ा नसल्यामुळे कचऱयाचे ढीग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून शहरामध्ये कचऱयाची समस्या मोठय़ा प्रमाणामध्ये जाणवू लागली आहे. ज्या ठेकेदाराला काम दिले आहे तो ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नाही, अशी तक्रार सर्वसाधारण सभेमध्ये अनेक नगरसेवकांनी केली होती. कचरा उठाववरून गदारोळही झाला होता. त्यावेळी महानगरपालिकेकडे असलेली वाहने दुरुस्त करून आपण पर्यायी व्यवस्थापन सुरू करू, असे सांगण्यात आले होते. तसेच ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम करून घेण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. विशेष म्हणजे उपनगर भागात आजही कचऱयाची गाडी येत नाही, त्यामुळे येथे कचरा उचलला जात नाही. त्यामुळे कचरा साचून मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली जात आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर शहरामध्ये दररोज 150 टन कचरा तयार होतो आणि अवघा 90 टन कचरा उचलला जातो. उर्वरित कचरा कुठे जातो, हा चर्चेचा विषय झालेला आहे. एकंदरीत प्रशासकीय पातळीवर कचऱयाचे योग्य नियोजन नसल्यामुळे नगरकरांना त्याचा फटका बसत आहे.
पावसामुळे कचरा रस्त्यावर
नगर शहरामधील कचऱयाची समस्या सुटायला तयार नाही. तीन महिन्यांनंतरही प्रशासनाला जाग यायला तयार नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. आज दुपारी झालेल्या पावसामुळे दाणदाण उडाली. साचून राहिलेला कचरा पावसामुळे रस्त्यांवर पसरल्याचे चित्र शहरात होते. कचऱयामुळे नागरिकांना होणाऱया त्रासानंतर तरी प्रशासनाला जाग येणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.

























































