बेनचे ‘स्ट्रोक्स’ वाया;  ऑस्ट्रेलियाकडे 142 धावांची आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार बेनचे स्टोक्स पुन्हा एकदा वाया गेले. ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांत गुंडाळून मैदान मारल्याच्या अविर्भावात असलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी आज निराशाजनक खेळ केला. बेन स्टोक्सने झुंजार आणि दमदार 80 धावांची खेळी करीत संघाला आघाडी मिळवून देण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण इतर खेळाडूंची साथ न लाभल्यामुळे ते अपुरे पडले. मात्र ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने इंग्लंडच्या आघाडीवीरांना आणि शेपटाला लवकर बाद करत 237 धावांत इंग्लंडचा डाव संपवला आणि ऑस्ट्रेलियाला 26 धावांची का होईना आघाडी मिळवून दिली. दुसऱया डावात ऑस्ट्रेलियाची 4 बाद 90 अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर ट्रव्हिस हेड (18) आणि मिचेल मार्श (17) यांनी खेळ सावरता संघाची आघाडी 142 पर्यंत वाढविली. दिवसअखेर इंग्लंडने 4 विकेट टिपल्यामुळे ही कसोटी रंगतदार अवस्थेकडे झुकली आहे.

गुरुवारच्या 3 बाद 68 या धावसंख्येवरून इंग्लंडला ऑस्ट्रेलियाची धावसंख्या गाठणार नसल्याचे चित्र उभे राहिले होते. आज दिवसाच्या दुसऱयाच चेंडूवर जो रुटने त्यावर शिक्कामोर्तब केले. पॅट कमिन्सने रुटला बाद करत इंग्लंडच्या गोटात अक्षरशः घबराट निर्माण केली. जॉनी बेअरस्टॉसुद्धा फार काळ टिकला नाही. फलकावर शंभर धावाही लागल्या नव्हत्या आणि इंग्लंडचा निम्मा संघ बाद झाला होता.

स्टोक्स पुन्हा नडला…लढला

लॉर्ड्सवरही बेन स्टोक्स इंग्लंडसाठी योद्धय़ासारखा लढला होता, पण त्याचे दीडशतक संघाला विजयाचा टिळा लावू शकले नाही. आजही स्टोक्सने कोसळलेल्या इंग्लंडच्या डावाला एकहाती सावरले. त्याने मोईन अलीबरोबर 44 धावांची भागी रचली. त्यानंतर विशी-तिशीच्या भागीदाऱया रचत स्टोक्सने संघाला द्विशतक ओलांडून दिले. गोलंदाजीत किमया करणाऱया मार्क वूडने आपल्या 8 चेंडूंतील 3 षटकार आणि एका षटकाराच्या छोटय़ा खेळीत 24 धावा चोपून काढल्या. तो बाद झाला तेव्हा इंग्लंडची 8 बाद 167 अशी अवस्था होती, पण तेव्हाच स्टोक्सने ब्रॉड आणि रॉबिन्सनबरोबर 32 आणि 38 धावांच्या भागीदाऱया करत संघाची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. स्टोक्सने पुन्हा एकदा घणाघाती खेळी करत 5 षटकार आणि 6 चौकार ठोकले, पण त्याची 108 चेंडूंतील खेळी 80 धावांवर संपली. तो सर्वात शेवटी बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने डावात आघाडी घेण्याची आपली मालिका सलग तिसऱया कसोटीतही कायम ठेवली. इंग्लिश कर्णधाराला आपल्या खेळीच्या जोरावर संघाला आघाडी मिळवून देता आली नसली तरी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने 91 धावांत 6 विकेट घेत संघाला 26 धावांची आघाडी मिळवून दिली. या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाचा मनोधैर्य पुन्हा एकदा उंचावले आहे. त्याची झलक त्याच्या दुसऱया डावात दिसली.