
भायखळा येथे ऐन गर्दीच्यावेळी सायंकाळी मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत झाल्याने अप-डाऊन धीम्या आणि अप फास्ट मार्गावरील लोकलचा वेग मंदावला होता. गाडय़ाच पुढे सरकत नसल्याने मागून येणाऱया गाडय़ांची एकामागोमाग रांगा लागल्या होत्या. सुमारे अर्ध्या तासात सदरचा बिघाड दुरूस्त झाला खरा. पण त्याचा परिणाम रात्री उशिरापर्यंत जाणवत होता. अनेक स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.
सायंकाळी 4.07 वाजता रेल्वेच्या भायखळा येथील सिग्नलमध्ये बिघाड झाला. त्याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱया धीम्या आणि जलद मर्गावरील गाडय़ांवर झाला. गाडय़ा मंद गतीने पुढे जात असल्याने डाऊनसाठी लोकल विलंबाने येत होत्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, परळ, दादर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मध्य रेल्वे मार्गावर नेहमीच सिग्नल फेलमुळे गैरसोय होत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत होते.
‘परे’च्या एसी लोकलमध्ये बिघाड; वांद्रय़ात रिकामी केली
पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलला लागलेले तांत्रिक बिघाडाचे ग्रहण काही केल्या संपत नसल्याचे समोर आले आहे. आज विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱया एसी लोकलमध्ये सकाळी 8.33 वाजता विलेपार्ले येथे बिघाड झाला. त्यामुळे लोकल वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. रेल्वे प्रशासनाने सदर लोकल धीम्या गतीने वांद्रे स्थानकात आणून रिकामी करत रद्द केली. त्यामुळे चर्चगेटसाठी निघालेल्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.



























































