
भ्रष्ट भाजपचा राज्यभर भंडाफोड करून सळो की पळो करून सोडू, असा इशारा काँग्रेसने आज दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजप सरकारकडून झालेल्या अन्यायाविरोधात काँग्रेसच्या वतीने आज मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि पदाधिकाऱयांनीही भाग घेऊन पाठिंबा दर्शवला होता.
सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा मौन सत्याग्रह करण्यात आला. यावेळी काळय़ा मुखपट्टय़ा बांधून भाजपचा निषेध करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राहुल गांधींना शिक्षा करून बेघर करणाऱया भाजपविरोधात वणवा पेटला आहे आणि या वणव्यात भाजपचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधींवर झालेल्या अन्यायाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागू आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले. काँग्रेसची लढाई सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे, असे याप्रसंगी वर्षा गायकवाड म्हणाल्या.





























































