सोहळा संस्कृती – या वर्षीचा अधिक श्रावण मास!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दा. कृ. सोमण

18 जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू होत आहे. चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ राखताना अधिक मास येतो. या मासाचे नेमके उपयोजन काय हे पाहणे रंजक ठरते.

या वर्षी मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार 16 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावण मास येणार आहे. अधिक मासाला  पुरुषोत्तममास, मलमास किंवा धोंडय़ा महिना असेही म्हणतात. अधिक श्रावण मासानंतर गुरुवार, 17 अॅागस्ट ते पावार 15 सप्टेंबर 2023 पर्यंत निज श्रावण मास येणार आहे. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी वगैरे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव- व्रते ही अधिक श्रावण मासात न करता निज श्रावण मासातच करावयाची आहेत.

प्राचीनकाली शास्त्रकारांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आरोग्य’ हे ओळखले होते. माणसाच्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य जर चांगले असेल तर जीवन सुखी व आनंदी होऊ शकते हे जाणले होते. शरीराचे आरोग्य

प्रामुख्याने आहारावर अवलंबून असते. माणसाने जर ऋतूप्रमाणे आहार घेतला तर शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ऋतूप्रमाणे जर सण राहिले तर सणांप्रमाणे माणसे आहारात बदल करतील आणि त्यांच्या शरीराचे आरोग्य चांगले राहील. परंतु ऋतू हे सूर्यावर

अवलंबून असतात आणि सण हे चंद्रावर अवलंबून असतात. म्हणून आपल्या पंचांगात चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घालण्यात आलेला आहे. त्यामुळे ठराविक सण ठराविक ऋतूत येतात. श्रावण महिना पावसाळय़ात येतो.पावसाळय़ात शरीराचे चलनवलन कमी असल्याने शरीराला हलक्या आहाराची जरुरी

असते. उपवासात आपण हलके म्हणजे पचनास सुलभ असे पदार्थ खातो. त्यामुळे शरीरातील मांद्य कमी होते. शरीर चपळ राहते. आधुनिक काळात शरीराचे मांद्य कमी करण्यासाठी ‘डाएटिंग’ करतात. श्रावण महिना पावसाळय़ात आल्याने धार्मिक कारणाने माणसे उपवास करतात. साहजिकच त्याचा शरीराच्या आरोग्यास फायदा होतो. थंडीत आपल्या शरीरास स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. दीपावली व पांतीचा सण थंडीत येतो त्यावेळी आपण तिळगूळ खातो. ज्याची थंडीत शरीराच्या आरोग्यासाठी खूप आवश्यकता असते. उत्सवांमुळे माणसे दु:ख, चिंता विसरून जातात, आनंदी राहतात म्हणून ठराविक सण हे ठराविक ऋतूंमध्ये येणे आवश्यक असते.

चांद्र-सौर मेळ 

पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो त्यावेळी पहिला तो अधिक मास व दुसरा तो निज मास म्हणून धरला जातो. आता या वर्षी रविवार, 16 जुलै 2023 रोजी उत्तररात्री 5 वाजून 6 मिनिटांनी सूर्य कर्क राशीत प्रवेश करीत आहे. नंतर गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करीत आहे. या काळात दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होत असल्यामुळे अधिक श्रावण आणि  निज श्रावण  अशी दोन नावे देण्यात आली आहेत. ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिक महिना धरला जातो. या वर्षीच पहा. मंगळवार, 18 जुलै 2023  ते  बुधवार, 16 ऑगस्ट 2023 या काळात सूर्याचा राशीबदल झालेला नाही. त्यामुळे श्रावण हा चांद्र महिना अधिक मास झाला आहे.

ही गोष्ट वेगळय़ा पद्धतीनेही समजून घेता येईल. 30 तिथींचा एक चांद्रमास होतो व 360 तिथींचे म्हणजेच  (बारा चांद्रमासांचे ) एक चांद्रवर्ष होते. एका सौरवर्षाच्या काळात तशा सुमारे 371 तिथी होतात. म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा 11 तिथीने लहान असते. दरवर्षी  11 तिथी शिल्लक राहून 30 तिथी झाल्या की, अधिक मास येऊन चांद्र आणि सौर पद्धतीचा म्हणजेच ऋतू आणि सण यांचा मेळ राखला जातो. जेव्हा अधिक मास येतो त्यावेळी 13 महिन्यांचे म्हणजे 390 तिथींचे  एक चांद्रवर्ष असते. एकदा अधिक मास आल्यापासून मध्यम मानाने साडेबत्तीस चांद्रमहिन्यांनी पुन्हा अधिक मास येतो. स्पष्ट मानाने दोन अधिक मासांमध्ये कमीत कमी 27 महिने व जास्तीत जास्त 35 महिने अंतर असते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व फाल्गुन या नऊ महिन्यांपैकी कोणताही महिना अधिक मास होऊ शकतो.

 अधिक मासात काय करावे? 

अधिक मासात संपूर्ण दिवस उपवास किंवा एक वेळ भोजन करावे. देवापुढे अखंड दीप लावावा. 33 अपूप म्हणजे अनरसे यांचे दान करावे. 33 अनरसे भगवान विष्णूला अर्पण करावेत असे सांगितले आहे, परंतु जावई हा विष्णूसमान मानला जातो. म्हणून अधिक मासात जावयाला 33 अनरशांचे दान देण्याची प्रथा सुरू झाली असावी. इथे 33 अंकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण तीन वर्षांत वाढल्या गेलेल्या 33 तिथी मानल्या जातात. अधिक मासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावी, मात्र काम्य कर्माचा आरंभ व समाप्ती करू नये. ‘केल्यावाचून गती नाही’ अशी कर्मे अधिकमासात करावयास हरकत नाही. नामकर्म, अन्नप्राशन, नित्यश्राद्ध हे संस्कार अधिकमासात करायला हरकत नाही. मात्र देवप्रतिष्ठा, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांती, गृहारंभ या गोष्टी अधिक मासात करू नयेत असे सांगण्यात आले आहे.

दान करा 

अधिक मासात दान करावे असे सांगण्यात आले आहे. हिंदुस्थानी संस्कृतीत दानाचे विशेष महत्त्व आहे. दान म्हणजे  ‘डोनेशन’ नव्हे. डोनेशन कोणी दिले आणि डोनेशन काय दिले ते जाहीर केले जाते, परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले ते गुप्त ठेवायचे असते. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळता कामा नये असे म्हटले जाते. अधिक मासाच्या निमित्ताने समाजातील गरजू गरीब लोकांना तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. दान केल्यामुळे माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. धन साठविल्याने नव्हे. दानासारखे या पृथ्वीवर धर्मकृत्य नाही. लोभासारखा शत्रू नाही. चारित्र्यासारखा दुसरा उत्कृष्ट अलंकार नाही आणि समाधानासारखे दुसरे धन नाही. या अधिक श्रावण महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, जलदान, श्रमदान, धनदान, विद्यादान, फलदान, अनरसे दान करता येईल. शिवाय रक्तदान, नेत्रदान, अवयव दानाचा संकल्प करता येईल. जीवनात आनंद-समाधानाची बाग फुलविण्याचा प्रयत्न करावयाचा हाच या वर्षीच्या श्रावण अधिक महिन्याचा संदेश आहे.

या पुढील अधिक मास असे येणार आहेत. 

  • 17 मे ते 15 जून 2026 – ज्येष्ठ,
  • 16 मार्च ते 13 एप्रिल 2029- चैत्र,
  • 19 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2031- भाद्रपद,
  • 17 जून ते 15 जुलै 2034 – आषाढ,
  • 16 मे ते 13 जून 2037 – ज्येष्ठ
  • 19 सप्टेंबर ते 17 अॅाक्टोबर 2039- आश्विन,
  • 18 जुलै ते 15 ऑगस्ट 2042 – श्रावण,
  • 17 मे ते 15 जून 2045 – ज्येष्ठ,
  • 15 मार्च ते 13 एप्रिल 2048 – चैत्र,
  • 18 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2050 – भाद्रपद अधिकमास येणार आहेत.

[email protected]

(लेखक ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत.)