चंद्रपुरात ढगफुटी सदृश पाऊस, अवघ्या काही तासात 240 मिलीलिटर पावसाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहरात आज झालेल्या पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडली. अवघ्या चार तासात 240 मिली लिटर पाऊस बरसला. या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले. शेकडो घरात पाणी शिरले. मागील दहा वर्षात असा पाऊस पहिल्यांदाच बरसल्याचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पावसाने महानगरपालिकेची पोलखोल ही केली. सखल भागात वस्ती असलेल्या नागरिकांना या पावसाच्या सर्वाधिक फटका बसला आहे.

मागील तीन दिवसांपासून संतगतीने सुरू असलेल्या पावसाने मंगळवार सकाळपासूनच रौद्र रूप धारण केले. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरले. घरात शिरलेले पाणी काढण्यासाठी नागरिकांची कवायत सुरु झाली आहे. मान्सून आला मात्र, पावसाचे आगमन झाले नाही. यादरम्यान तुरळक पावसाची नोंद होत होती. यामुळे शेतकरी आणि सामान्यवर्गात चिंता व्यक्त करण्यात येत होती. अखेर आज वीज गर्जनेसह दमदार पावसाला सुरुवात झाली. सकाळ पासूनच हा पाऊस सुरू होता. मुसळाधार पावसामुळे शहरातील जनजीवन प्रभावित झाले आहे.

रस्ते दिसू लागले नदीसारखे..

आज सकाळ पासूनच चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यावरून नदी पात्रासारखे पाणी वाहत आहे. ठक्कर कॉलनी, महसूल कॉलनीत पाणी शिरले आहे. गांधी चौकात असलेला शहरातील मुख्य गोलबाजार जलमय झाला आहे. सर्वत्र पाणी वाहत असल्याने वाहनाचा रांगाच रांगा दिसत. अद्यापही पावसाचा जोर ओसरला नाही. चंद्रपूर शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत तर ठक्कर, महसूल कॉलनीतील अनेक घरात पाणी शिरले आहे.