‘स्नेहल’ स्वरात रसिक झाले चिंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्वर स्नेहल’ हा गेल्या पिढीतले एक हरहुन्नरी संगीतकार स्नेहल भाटकरांच्या सांगीतिक कारकीर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम 17 जुलै रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त गडकरी रंगायतन, ठाणे येथे झाला.

मूळचे भजनी परंपरा आणि आवड असलेल्या भाटकर बुवांनी भजन, नाटय़ संगीत, अभंग, गवळण, भावगीत आणि हिंदी-मराठी चित्रपट संगीत अशा सर्व प्रकारांत सहजतेने चाली बांधल्या. तलत, महेंद्र कपूर, हेमंत कुमार, मुकेश, रफी या त्या काळच्या नामवंत गायकांकडून त्यांनी विविध प्रकारची गाणी गाऊन घेतली. त्याचप्रमाणे गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, गीता, शमशाद बेगम, मुबारक बेगम, सुमन कल्याणपूर या सर्व गायिकांनीसुद्धा त्यांच्या सुरेल चालींचे सोने केले. इतकेच काय तर अभिनेत्री नूतनने त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायनही केले. आई सखुबाईकडून गायकीचे धडे, भजनी परंपरा इथपासून सुरू झालेला त्यांचा सांगीतिक जीवनपट स्वर स्नेहल कार्यक्रमात उत्कृष्टरित्या सादर झाला. कार्यक्रमाचे आयोजक होते ‘चौरंग’चे अशोक हांडे आणि त्यांचा वाद्यवृंद.

अशोक हांडे यांचे ओघवते निवेदन आणि सुरेल गाणी अशा या कार्यक्रमाला दर्दी श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘छबिली’, ‘दिवाली कि रात’, ‘डाकू’, ‘हमारी याद आयेगी’ या हिंदी चित्रपटांच्या तसेच ‘चिमुकला पाहुणा’, ‘संत तुकाराम’, ‘एक धागा सुखाचा’ या मराठी चित्रपटांतली अवीट गोडीची गाणी, अभंग, नाटय़ संगीत, गवळण प्रीती वारियर, सचिन मुळे, गौतम कामथ, प्रमोद सोहोनी, शर्वरी जाधव, नीलाक्षी पेंढारकर या गायकांनी सुरम्य सादर केली. सुसज्ज वाद्यवृंदात अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू (कीबोर्ड) आणि महेश खानोलकर (व्हायोलिन) सारखे पट्टीचे वादक होते. या सर्व कलाकारांनी हिंदी चित्रपट विश्वात नाव कमावणाऱया काहीशा उपेक्षित मराठी संगीतकाराला सांगीतिक मानवंदना दिली.

‘भूमिकन्या’ चित्रपटातले ग. दि. माडगूळकरांचे ‘मी पुन्हा वनांतरी फिरे हरिणीवाणी’, ‘एक धागा सुखाचा’मधील ‘कशी होती रे माझी आई’, ‘काय तुझे उपकार पांडुरंगा’, ‘मज नकोत अश्रू घाम हवा’, मारू बिहाग रागातले ‘तुजसाठी शंकरा’ या मराठी, तर ‘लेहरो पे लहर’, ‘सोचता हूँ ये क्या किया मैने’ आणि ‘हमारी याद आयेगी’ या हिंदी गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘खेळे भवरा राधिकेचा नवरा’ या संत एकनाथांच्या गवळणीने तर ‘वन्स मोर’ घेतला. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे प्रमुख पाहुणे आणि स्नेहल, मृदुला आणि अविनाश भाटकर कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. पुढील वर्षी स्नेहल भाटकर जयंतीला हाच कार्यक्रम त्यांच्या जन्मगावी म्हणजेच भाटे इथे करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला.