प्रॉमिसिंग चेहरा – कॅमेऱ्याची आवड अधिक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉलेजमधील एकांकिका स्पर्धा या काही जणांच्या आयुष्यातील टार्ंनग पॉइंट ठरतात आणि मग टीव्ही मालिकांचे करीअर त्यांच्यासाठी खुले होऊन जाते. सन मराठी वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत ‘आदित्य’ ही प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे करण बेंद्रे …

आदित्य बेंद्रे याचे शालेय शिक्षण श्री. मा. बालनिकेतन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात झाले. सिडनहॅम कॉलेजमध्ये त्याने बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला आणि सिडनहॅममधील मराठी साहित्य मंडळ, ड्रमॅटिक सोसायटी यातील उपक्रमांत, एकांकिकांमध्ये तो सहभागी होऊ लागला. आयएनटी, इप्टा अशा आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तो सातत्याने सहभागी होत होता. ‘निर्वासित’ नावाच्या एकांकिकेत तो खुल्या गटाच्या स्पर्धेत सहभागी झाला. या एकांकिकेतील त्याचे काम ‘सुयोग’ नाटय़ संस्थेच्या संदेश भट यांनी पाहिले होते. संदेश भट यांनी ‘अनन्या’ नाटकात ‘शेखर सरपोतदार’ ही भूमिका करशील का? असे करणला विचारले. करणने ती भूमिका स्वीकारली आणि अवघ्या दोन दिवसांत करण त्या भूमिकेसाठी रंगभूमीवर उभा राहिला. या नाटकाने त्याला खूप यश मिळवून दिले.

त्यातूनच पुढे कोठारे व्हिजनची ‘प्रेम पॉयझन पंगा’ ही झी युवा चॅनलवरील मालिका करणला मिळाली. सध्या ‘सुंदरी’ मालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी करण म्हणाला, ‘सुंदरी’ या मालिकेचे कथानक नेहमीपेक्षा वेगळे आहे. यात आदित्य ही भूमिका मी करत असून त्याचे ज्या मुलीवर प्रेम आहे, त्या मुलीशी त्याचे लग्न होत नाही आणि त्याला ‘सुंदरी’बरोबर लग्न करावे लागते, पण नंतर तो अनूबरोबरदेखील लग्न करतो. त्याची दोन लग्ने झाली आहेत. त्यामुळे यात कधी तो नायक आहे, तर कधी खलनायक. अशा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही शेड्स असणारी ही भूमिका मला आव्हानात्मक वाटते.

एकांकिका, नाटक, मालिका आणि वेब सीरिज या सर्व माध्यमांत काम केलेल्या करणला कॅमेरा हे माध्यम जास्त आवडते. तो म्हणतो, पॅमेरा तुमची प्रत्येक रिअॅक्शन अतिशय उत्तम पद्धतीने टिपत असतो. पॅमेऱयासमोर वावरताना आपण एखादे दृश्य कसे चांगल्या प्रकारे चित्रित करू, आपल्या देहबोलीतून ते दृश्य कसे अधिकाधिक परिणामकारक करू, याचा विचार मी करत असतो. डेली सोपमध्ये काम करत असल्याने जवळ जवळ बावीस ते पंचवीस दिवस मी माझ्या कुटुंबीयांपासून दूर असतो याची खंत मनाला वाटते, पण जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा मी मुंबईला जाऊन पूर्ण वेळ कुटुंबीयांसाठी देतो. ती ऊर्जा घेऊन पुन्हा मालिकेसाठी कोल्हापूरला येतो. करणने ‘फूटफेरी’ नावाच्या चित्रपटात पोलीस ऑफिसरची भूमिका केली आहे. अशा चांगल्या भूमिकांच्या तो प्रतीक्षेत आहे.