महिला बचत गटांना प्रशिक्षण देणाऱया प्रेरिका उपेक्षितच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

राज्यातील लाखो महिला बचतगटांना मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देणाऱया प्रेरिका मागील एका दशकाहून अधिक काळ उपेक्षित आहेत. 30 हजारांहून अधिक प्रेरिका महिना अडीच ते तीन हजार मानधनावर काम करीत आहेत. मानधनाचे स्वरूप कामाच्या व्यापापुढे फार अल्प असून मानधनवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र श्रमिक सभेच्या वतीने महाराष्ट्र प्रेरिक सभेच्या प्रमुख पदाधिकाऱयांनी ग्रामविकासमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

प्रेरिका अतिशय अल्प मानधनावर काम करीत असल्याची जाणीव राज्य सरकारला असून येत्या दोन महिन्यांत प्रेरिकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अलीकडेच राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ केली आहे. या सेविकांना निवृत्तीनंतर ग्रॅच्युईटी लागू होते. मात्र उमेद अभियानाच्या प्रेरिकांची बाजूच सरकारसमोर मांडली न गेल्याने त्यांचे प्रश्न आणि मागण्या अनुत्तरित राहिल्या आहेत, याकडेसुद्धा महाराष्ट्र प्रेरिक सभेच्या पदाधिकाऱयांनी लक्ष वेधले. अल्प मानधनावर काम करत असताना कामाचा भाग म्हणून लागणारे झेरॉक्स, मोबाईलचा वापर तसेच प्रवास यासाठीचा खर्चसुद्धा प्रेरिकांना आपल्या मानधनातून करावा लागतो. हे सर्व प्रश्न लक्षात घेता नियुक्तीपत्रासह प्रेरिकांचे मानधन किमान 18 हजार रुपये करण्यात यावे, मानधन नियमितपणे मिळावे व प्रेरिकांच्या खात्यावर जमा करावे, केलेल्या कामाचे परीक्षण ग्राम संघामार्फत न करता वरिष्ठ कर्मचाऱयांकडून करावे आणि निवृत्तीनंतर अंगणवाडी कर्मचाऱयांप्रमाणे ग्रॅच्युईटी लागू करावी, अशा मागण्यांचे निवेदन ग्रामविकासमंत्र्यांना देण्यात आले.

याप्रसंगी जनता दलाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, कोकण संघटक संजय परब, महाराष्ट्र श्रमिक सभेचे सरचिटणीस केतन कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश नलावडे यांच्यासह महाराष्ट्र प्रेरिक संघाच्या सिंधुदुर्ग अध्यक्ष मनीषा नारकर, सचिव साक्षी खानोलकर आणि खजिनदार विशाखा परब यांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी प्रमिला देवरुखकर, मानसी साखरपेकर, दीपिका मुणगेकर, अंजली तेली, सिद्धी पांचाळ आदी उपस्थित होते.