
राधानगरी धरणातून पाणी सोडल्यावर पाणी पातळी पाच फूट वाढते आणि पूरस्थिती निर्माण होते. पाणी सोडले तेव्हा मी योगायोगाने शिर्डीत होतो, मी साईबाबांकडे प्रार्थना केली आणि यंदा एक फुटानेही पाणी पातळी वाढली नाही. याला अंधश्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा, पण देवाकडे प्रार्थना केल्यामुळेच पूरस्थिती कमी झाली.
पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक भागांतील पूर ओसरत असताना मिंधे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरच्या पुरावर अजब तर्कट मांडले आहे. ‘मी शिर्डीत साईबाबांना प्रार्थना केल्याने कोल्हापुरात पूर आला नाही’, असे ते म्हणाले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पावसाने विश्रांती घेतल्याने राधानगरी धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले. अजून काही दिवस पाऊस पडला असता तर अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली असत़ी मात्र, निसर्गातही देव आहे हे जाणवले, असेही ते म्हणाले.
नाशिकला या, धरणं भरून द्या
केसरकर यांच्या आश्चर्यकारक वक्तव्याची मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलीच फिरकी घेतली. तसे असेल तर तुम्ही आमच्या नाशिकला या, देवाचा धावा करा आणि धरणं पूर्ण भरून द्या, असे आवाहनच त्यांनी केसरकर यांना केले. या जुगलबंदीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
























































