
आपण काहीतरी जगावेगळे करावे जेणेकरून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल असे थोड्या फार फरकाने प्रत्येकालाच वाटते. आणि मग यातून काहीतरी धाडस, किंवा धाडसी प्रकार केले जातात. यामध्ये मग अनेक काल्पनिक प्रकार प्रत्यक्षात उतरविले जातात. भयंकर राक्षस हवेत तरंगणाऱ्या गोष्टी.. किंवा मग उडती परी. हल्ली हा या उडणाऱ्या परीचे वेड टिक टाॅक व्हिडिओमध्ये पसरले आहे. या परीची नक्कल करण्यासाठी स्वत:लाच हवेत टांगून घेतले जाते आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला जातो. यामध्ये अनेक कपोलकल्पित , अशक्यप्राय वाटणाऱ्या.. प्रसंगी जीवावर बेतणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न केला जातो. आत्महत्येचे नाटक.. शीर नसलेले तरंगते धड.. सामान्य माणसांना धडकी भरविणारे हे प्रकार असतात. एका व्हिडिओमध्ये एका मुलीचे डोके अस्पष्ट असलेल्या आरशासमोर लटकलेले दिसले. सुरुवातीला, असे दिसते की मुलीने स्वतःला लटकवले होते. या व्हिडिओचा खूप निषेध करण्यात आला. बोट-जंपिंग, स्कार्फ गेम अशा विविध धोकादायक व्हिडिओसाठी या अॅपवर यापूर्वीही टीका करण्यात आली होती. मनोविकार तज्ञांच्यामते अशा प्रकारच्या धोकादायक अॅप्सचा प्रसार फार झपाट्याने होत आहे.. हा प्रसार पौगंडावस्थेतील मुलांसाठी चिंता वाढवणारा आहे. ज्यांच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतात.. किंवा ज्यांच्यात काहीतरी न्युनगंडाची भावना असते.. किंवा ज्यांना वारंवार आत्महत्या करावीशी वाटते अशांना या अॅपचे प्रचंड आकर्षण असते.
या अॅपचे अनेक दुष्परिणाम मनोविकार तज्ञांनी स्पष्ट केले आहेत. अशा प्रकारचे व्हिडिओ पहिल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होऊ लागतो. फिट्स येण्याचे प्रमाण वाढते, मानसिक आरोग्य बिघडते. मूळ चायना बनावटीच्या या अॅप्सवर आपल्या देशात बंदीही घातली आहे. पण चुकीच्या गोष्टी व्हायरल होतातच.






















































