आभाळमाया – ‘अक्ष’म्य उपसा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

विराट विश्वाचा अभ्यास पृथ्वीवरील आपल्या अस्तित्वाच्या संदर्भात (सापेक्ष) असतो. कारण आपली पृथ्वी एका ताऱयाभोवती फिरणारा ग्रह आहे. याचाच अर्थ आपण सारे अंतराळाचा एक भाग आहोत. खगोलामुळे भूगोल आहे हे एकदा लक्षात आले की, सबंध विश्वातलं आपल्या ‘नगण्य’ भासणाऱया पृथ्वीचं महत्त्व लक्षात येतं.

सूर्यापासून जन्माला आलेली पृथ्वी आणि भोवती फिरणारा चंद्र यांच्या समन्वयातून जीवसृष्टीची उत्पत्ती झाली आहे. या जीवसृष्टीतले आपण ‘प्रगत’ जीव. प्रगत म्हणजे काय तर सभोवतालचं आपलं आकलन आता वैश्विक पातळीपर्यंत पोहोचलेलं आहे. अंतराळ विज्ञानातल्या या प्रगतीने थक्क करणारा प्रवास अवघ्या पासष्ट वर्षांत साध्य केलाय. ग्रहमालेतील इतर ग्रह, परताऱयांभोवतीचे अन्य ग्रह या सगळय़ांचा धांडोळा हबल ते जेम्स वेबसारख्या अवकाश दुर्बिणी घेत आहेत. ती निश्चितच अभिमानास्पद गोष्ट म्हणावी लागेल.

मात्र एका बाजूला ही ऊर्ध्व दिशेची वेगवान प्रगती होत असताना आपल्या पृथ्वीवर खोल भूगर्भात काही गडबड होतेय याकडे आपले किती लक्ष आहे? लाव्हारस, भूपंप, सुनामी या तर निसर्गनिर्मित गोष्टी आहेत. त्या आपल्या ताब्यात नाहीत, पण पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेली शेती आणि पिण्यायोग्य पाणी कसे नि किती वापरावे यावर आपण विचार करू शकतो. प्रदूषणावर विचार करू शकतो. तोही होतो, चर्चा होतात. आंतरराष्ट्रीय परिषदा होतात, पण प्रभावी कृती होताना दिसत नाही. असे म्हणण्याचे कारण म्हणजे तसा कृती कार्यक्रम जगभर एकाच वेळी झाला तर त्याचे चांगले परिणाम दिसायला हवेत. साधं पृथ्वीवरच्या विविधरूपी मानवनिर्मित कचऱयाचं योग्य व्यवस्थापन माणसाला जमलेलं नाही हे कटू असलं तरी सत्य आहे.

याचा विचार आणि कृती कार्यक्रम तातडीने हाती घ्यायला हवा. कारण त्यावर आपल्या पुढच्या पिढय़ांचं भवितव्य आणि एकूणच माणसासकट सर्व प्रजातींचे अस्तित्व अवलंबून आहे. हवा, पाणी, अन्न या क्रमाने आपल्या जीवनाला अत्यावश्यक ठरणाऱया मूलभूत गोष्टींमध्येच काही घोळ झाला तर श्वास, तहान, भूक धोक्यात येईल याची जाणीव प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने ठेवायला हवी. कारण या गोष्टींबद्दलचं वैज्ञानिक वृत्त येतंय ते फारसं बरं नाही.

क्लायमेंट चेंज पिंवा वातावरणीय बदलाला जी काही कारणे आहेत त्यातले महत्त्वाचे कारण आहे गेल्या दोनशे वर्षांत झालेल्या हवापाण्याचे जागतिक प्रदूषण आणि वाढतं तापमान. याचा दुष्परिणाम जगभरच्या पीकपाण्यावर झाल्याचे आपणही अनुभवत आहोत.

वास्तविक, पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पडणारे पाणी दरवर्षी साधारण तेवढेच असते. एक इंच चांगला पाऊस झाला (अडीच सेंटिमीटर) तर एका चौरस फुटावर सुमारे 2000 लिटर पाणी पडतं. चौरस मीटरवर केवळ एक मिलिमीटर पाऊस पडला तरी एक लिटर पाणी जमा होतं. पावसाचं पाणी हेच आपलं ‘जीवन’ आहे. कारण पृथ्वीवर जेवढं पाणी आहे, त्यातलं सुमारे 97 टक्के समुद्रात आहे. या ‘खाऱया’ पाण्यातून ‘गोडय़ा’ पाण्याची वाफ होऊन आकाशाला भिडते आणि पावसाच्या रूपाने आपल्याला पेयजल देते. त्यातही दीड-दोन टक्के पाणी पृथ्वीवरच्या हिमखंडात गोठून पडतं. उरलेलं एक टक्कासुद्धा नीट वापरलं तर पुरेस ठरेल, पण पाऊस दरवर्षी सगळीकडे सारखाच पडेल असे नाही. अवेळी वृष्टी होऊन महापूर आले तर बरचसे पाणी सुमद्रालाच जाऊन मिळते.

वेळेवर आणि ठरावीक गतीने (पेस) पाऊस पडला तर धरित्री सुजलाम, सुफलाम होऊ शकते, परंतु हे निसर्गचक्र गेल्या काही (वीसेक) वर्षांत बिघडलंय. मग दुष्काळी परिस्थितीत निदान पिण्याच्या पाण्यासाठी तरी भूजलाचा वापर करावा लागतो. पृथ्वीवर सुमारे तीस हजार फुटांपर्यंत भूजल असू शकतं. अर्थात एवढय़ा खाली न जाता ते पन्नासेक फुटांवरच मिळायला हवं. शिवाय ठरावीक मर्यादेपलीकडे खणून भूजल वापरणं चुकीचं ठरतं. तरी गेल्या काही वर्षांत शे-दोनशे फूट खणूनही ‘पाणी लागत नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या लोकसंख्येसह, काही उत्पादनांसह अनेक कारणांनी खोल जाणारी पाण्याची पातळी भूमीमध्ये जलभरण करून वाढवायला हवी. ‘वॉटर टेबल्स’ रिचार्ज करण्याची गरज आहे.

तसं घडलं नाही तर काय ‘बिघडतं’ याचं एक धास्तावणारं उत्तर मिळालंय, ते म्हणजे भूजलाच्या जगातील अमर्याद उपशामुळे पृथ्वीचा अक्ष कलतोय. साडेतेवीस अंशांनी स्वतःच्या अक्षाशी कललेली पृथ्वी आणखी ‘कलली’ तर पृथ्वीवरचं ऋतुचक्रच धोक्यात येईल. डायनॉसॉरच्या काळात पृथ्वीचा अक्ष 12 अंशांनी कललेला होता (80 कोटी वर्षांपूर्वी) असं म्हटलं जातं. आता तो लाखो वर्षे साडेतेवीस अंशांनी कललेला असल्याने त्याच्याशी निगडित जैविक चक्राला आपण सरावलो आहोत. सुमारे 40 हजार वर्षांत हा अक्ष 22 ते 24 अंशांनी कलतो असं म्हटलं जातं. 1993 पासून भूगर्भातील 2 ट्रिलियन टन (म्हणजे 2 वर 12 शून्य) एवढा पाण्याचा उपसा झाला आहे. गेल्या तीन दशकांतला माणसाचा हा प्रताप आहे. पाण्याच्या अमर्याद उपशाने तो या काळात 30 सेंटिमीटर (पूर्वेकडे) कलला आहे. तसे असेल तर हा माणसाचा ‘अक्ष’म्य अपराध म्हणायला हवा. कारण इतर प्राणी भूपृष्ठावर उपलब्ध पाण्यावर जगतात आणि मोठी झाडं योग्य प्रमाणात जमिनीखालचं पाणी शोषतात. माणसांकडून मात्र पाण्याचा उपसा असाच सुरू राहिला तर पृथ्वी तरी काय करणार? तिचा वाढता ‘कल’ आपल्याला आपण आत्मनाशाकडे कलत नाही ना, असं मुक्तपणे विचारतोय. यावर विचार करायला कुणाला वेळ आहे?