सलग दुसऱ्या जेतेपदासाठी दक्षिण विभाग सज्ज; देवधर करंडकासाठी पूर्व विभागाविरुद्ध अंतिम झुंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखळीत सलग पाच विजय नोंदविणारा दक्षिण विभागाचा संघ देवधर करंडकाच्या अंतिम लढतीत विजयाचा षटकार ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी पश्चिम विभागावर मात करत दुलीप करंडकावर आपले नाव कोरले होते. आता त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी ते उत्सुक असून त्यांची गाठ पूर्व विभागाशी पडणार आहे.

पूर्व विभागानेही या स्पर्धेत जोरदार कामगिरी केली असून त्यांनी अखेरच्या साखळी लढतीत बलाढय़ पश्चिम विभागाचा पराभव करून आपले अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते. पाच सामन्यांच्या साखळी स्पर्धेत पूर्व विभागाला केवळ दक्षिण विभागाकडून हार सहन करावी लागली होती. साखळीतील त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पूर्व विभागाने आज जोरदार सराव केला.

पूर्व विभाग हा स्पर्धेतील एकमेव संघ आहे, ज्याने दोनवेळा तीनशेचा टप्पा गाठला आहे. तसेच रियान परागनेही या स्पर्धेत दोन शतके ठोकली आहेत. पूर्व विभागाने 2004-05 साली आपले शेवटचे जेतेपद जिंकले होते. तसेच दक्षिण विभागाने आतापर्यंत आठवेळा देवधर करंडक जिंकला आहे. मात्र त्यांनी 2001-02 साली आपला शेवटचा करंडक जिंकला होता. गेली 22 वर्षे कोऱया असलेल्या पाटीवर पुन्हा एकदा त्यांना आपले नाव कोरायचे आहे.