
>> सुदाम कुंभार, (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक)
आजच्या काळात मातृभाषेबरोबर परकीय भाषा शिकणे आणि त्यावर प्रभुत्व सिद्ध करणे हासुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक वैशिष्टय़पूर्ण पैलू ठरू शकतो. तसेच करीअरचे अनेक पर्याय तुमच्यासमोर खुले होतात.
आज महाराष्ट्रातील विविध संस्था तसेच विद्यापीठांमध्ये स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, जापनीज, चायनीज, ऑस्ट्रेलियातील न्यूनगर बोलीभाषा आणि संस्कृती इत्यादी विविध भाषांचे अभ्यासक्रम राबवले जातात. यामध्ये सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा आणि पदवी इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कोणती परकीय भाषा शिकणे हे तुमच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हतेचे एक महत्त्वाचे प्रमाणपत्र ठरते. परकीय भाषा शिकल्यामुळे आपण ज्या देशाची भाषा शिकून त्या देशात जाऊन स्थलांतर करून त्या देशातील संगीत, संस्कृती, साहित्य इत्यादीचा सखोल अभ्यास करू शकतो व स्वतःचा व्यावसायिक विकास करण्यासाठी ती एक चांगली संधी असते. आजच्या माहितीनुसार द्विभाषिक कौशल्य असलेल्या उमेदवारांची प्रतिवर्षी 20 टक्क्यांपेक्षा जास्त मागणी वाढत आहे.
नोकरीच्या संधी
– पर्यटन क्षेत्रात इंग्रजी भाषा अवगत नसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संवाद साधताना परकीय भाषेचा उपयोग प्रभावी ठरतो. तसेच जगभरात आंतरराष्ट्रीय पर्यटक वाढत असल्यामुळे परकीय भाषा शिकणे आज गरजेचे झाले आहे.
– परकीय भाषा कौशल्य आत्मसात केल्यामुळे इमिग्रेशन, कस्टम विभाग किंवा दूतावासामध्ये नोकरीची संधी अधिक असते.
– पत्रकारिता, जनसंपर्क, मनोरंजन आणि कला, विविध प्रकाशने आणि अनुवाद तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करण्याची संधी.
– परकीय भाषेच्या तुमच्या ज्ञानासह तुम्ही विविध कंपन्यांसाठी अनुवादक किंवा दुभाषी म्हणून काम करू शकता. याशिवाय तुम्ही भाषा तज्ञ किंवा फ्रिलान्सर ट्रान्सलेटर म्हणूनही काम करू शकता.
– जर तुम्हाला चिनी भाषेचे सखोल ज्ञान असेल तर हिंदुस्थान आणि चीन देशांमधील इम्पोर्ट-एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे. त्याबरोबरच तुम्ही हाँगकाँग, तैवान, मंगोलिया, मलेशिया, फिलिपिन्स आणि थायलंडमधील कंपन्यांशीसुद्धा व्यवहार करू शकता.
– काही मोठय़ा कंपन्या त्यांची काही कामे आऊटसार्ंसगच्या माध्यमातून करत असतात. त्यामुळे नॉलेज प्रोसेस आऊटसार्ंसग, बिझनेस प्रोसेस आऊटसार्ंसग, आयटी इंडस्ट्री आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यामध्येसुद्धा तुम्ही करीअर करू शकता.
– आपला देश ही जगातील तिसरी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे देशात विविध बहुराष्ट्रीय कंपन्या आज वाढत आहेत आणि त्यापैकी काही संस्था सरकारी यंत्रणांसोबत काम करत आहेत. तुम्हाला अशा संस्थांमध्ये काम करण्याची मोठी संधी आहे.
राज्यातील काही विद्यापीठे अन् संस्था
जी एच रायसोनी स्कूल ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट नागपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट, एक्सेल अकॅडमी अंधेरी, सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन लँग्वेज इन इंडियन लँग्वेजेस पुणे, इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिटय़ूट ऑफ सिम्बॉयसिस पुणे, मॅक्स मुलर भवन पुणे, एम.आय.टी स्कूल ऑफ लँग्वेजेस पुणे, शिवाजी विद्यापीठ कॉलेज लँग्वेज डिपार्टमेंट, रामनारायण रुईया कॉलेज मुंबई, फर्ग्युसन कॉलेज पुणे अशा अनेक संस्था व विद्यापीठांत परदेशी भाषा शिकता येतात.






















































