‘जयप्रभा’च्या जागा खरेदीत कोल्हापूरकरांची फसवणूक; शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नातेवाईक पानपट्टीवाल्याला पुढे करून राजेश क्षीरसागर यांनी लावला चुना

ऐतिहासिक ‘जयप्रभा स्टुडिओ’ची जागा खरेदी करणाऱया पानपट्टीवाल्याकडे साडेसहा कोटी रुपये कोठून आले? या व्यवहारात काळा पैसा किती दिला? याचा हिशेबच नाही. यातून स्वतःचा नातेवाईक असलेल्या पानपट्टीवाल्याला पुढे करून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरकरांना चुना लावल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

जयप्रभा स्टुडिओच्या जागाखरेदीचा व्यवहारच संशयास्पद असून, यामध्ये क्षीरसागर यांच्या मुलाच्या नावे 30 हजारांची गुंतवणूक असल्याने याप्रकरणी पानपट्टीचालक सचिन राऊतसह क्षीरसागर कुटुंबीयांची नार्को टेस्ट, तसेच ईडी चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही इंगवले यांनी केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, विशाल देवकुळे, स्मिता सावंत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओची शिल्लक जागा कोरोनाकाळात गुपचुप विकली गेली. काही वादग्रस्त खरेदीदारांनी एक कंपनी तयार करून त्यामार्फत मंगेशकर कुटुंबीयांसोबत या जागेचा व्यवहार केला. या कंपनीत राजेश क्षीरसागर यांच्या मुलाचीही भागीदारी असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. दोन-तीन दिवसांपूर्वी राज्य शासनाने या स्टुडिओची जागा महापालिकेला हस्तांतरित करून घेण्याचे परिपत्रक काढले. जागा खरेदी करणाऱया कंपनीस पर्यायी जागा द्यावी किंवा ‘टीडीआर’ पद्धतीने मोबदला देण्याच्या सूचनाही महापालिकेला केली आहे. त्यामुळे क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आपण चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला नसल्याचा पुनरुच्चार क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर आज शिवसेनेने जयप्रभा स्टुडिओच्या जागाविक्रीतील फसवणूक चव्हाटय़ावर आणली आहे.

पानपट्टीवाल्याने साडेसहा कोटी भरले

रविकिरण इंगवले म्हणाले, ‘राज्य शासनाच्या ताब्यातील सि.स.नं. 2814/क (जयप्रभा स्टुडिओ) या जागेचे क्षीरसागर कुटुंब आणि पानपट्टीचालक सचिन राऊत यांनी शासन, मिळकतधारक यांना घेऊन चुकीची कागदपत्रे दाखवून 15 फेब्रुवारी 2020 रोजी खरेदीपत्र केले. मुळात संस्थानकाळात स्टुडिओसाठी या जागेचा उपयोग करावा, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जागा हस्तांतर करता येणार नसल्याची अट घालून पेंढारकर कुटुंबीयांना जागा दिली होती. तरीही पेंढारकर यांनी शक्कल लढवून लिलाव पद्धतीने ही जागा लता मंगेशकर यांना हस्तांतरित केली. त्याच वेळी अटी व शर्तींचा भंग झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाची फसवणूक करीत विनापरवाना मंगेशकर कुटुंबीयांनी ती जागा राजेश क्षीरसागर यांचा नातेवाईक सचिन राऊत याला विकली. खरेदीपत्रात सहा कोटी 50 लाख रुपये एकरकमी पानपट्टीचालक सचिन राऊत याने भरले आहेत. त्यामुळे पानपट्टीवाल्याच्या नावे भरलेला हा पैसा क्षीरसागर यांचाच असल्याचा संशय व्यक्त करीत पानपट्टीवाल्याकडे इतका पैसा कोठून आला? याचे उत्तर क्षीरसागर यांनी जाहीररीत्या द्यावे,’ असे आव्हानही इंगवले यांनी दिले आहे.

फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करा

मुळातच यामध्ये राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज यांचा हस्तक्षेप असून, अनावधानाने क्षीरसागर यांनी मुलाने पैसे गुंतविल्याचे मान्यच केले होते. त्याची व्हिडीओ क्लिप आजही आहे. क्षीरसागर व सचिन राऊत यांनी संस्थानकालीन अटी व शर्ती न पाळता खरेदी दस्तऐवज केले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांना बेडय़ा ठोकून त्यांची नार्को टेस्ट करावी. तसेच त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी रविकिरण इंगवले यांनी केली आहे.

उच्च न्यायालयात जाणार

या व्यवहाराबाबत उद्या (9 रोजी) शिवसेनेच्या वतीने आयकर विभागासमोर निदर्शने करून अधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे. शिवाय महापालिकेने विकसकाला पर्यायी जागा वा टीडीआर देऊ नये, अशी भूमिका स्पष्ट करीत याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे हरकत नोंदविली आहे. तसेच राज्य शासनाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले.