
>> कपिल पाटील
महात्मा फुले आणि आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक, सत्यशोधक चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. हरी नरके यांचे निधन धक्कादायक आणि वेदनादायक आहे.
अलीकडे मनोहर कुलकर्णी (भिडे) यांनी गांधीजींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात हे वारंवार घडत आहे. महात्मा फुले यांच्या बदनामीची अशीच राळ बाळ गांगल यांनी ग. वा. बेहरे यांच्या ‘सोबत’ साप्ताहिकातून उठवली होती. महात्मा फुले यांना ‘देशद्रोही’ म्हणण्यापर्यंत याच गटाची मजल गेली होती. त्या वेळेला त्याचा वैचारिक प्रतिवाद अत्यंत समर्थपणे हरी नरके यांनी केला. महात्मा फुले यांचे योगदान सांगणारे आणि गांगल यांच्या आरोपांना चोख उत्तर देणारे त्यांचे पुस्तक त्या काळात खूप गाजले. ‘महात्मा फुले यांची बदनामी ः एक सत्यशोधक’ हे ते पुस्तक. चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी ती मोठी शिदोरी ठरली.
सती प्रथेविरोधात काम करणारे राजा राममोहन रॉय, स्त्राr शिक्षणासाठी आपले आयुष्य देणाऱया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वारंवार बदनामी नथुरामी शक्तींकडून केली जात आहे. त्याचा वैचारिक प्रतिवाद व्हायला हवा. हरी नरके त्यांच्या अभ्यासू मांडणीतून तसा प्रतिवाद नेहमीच करत असत.
हरी नरके स्वतः सत्यशोधक विचारांचे होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरही त्यांची अढळ निष्ठा होती. महाराष्ट्रातील आंबेडकरी साहित्याचे खंड प्रकाशित करण्याच्या समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. सत्यशोधक आणि विद्रोही साहित्य चळवळीशीही त्यांचा नजीकचा संबंध होता. ‘राष्ट्र सेवा दल’, ‘युक्रांद’ यांसारख्या संघटनांशी त्यांचा संबंध होता.
पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्राध्यापक होते. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर ते उपाध्यक्ष होते. मराठी भाषेला संस्कृत, तामीळ, तेलुगूप्रमाणे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ते प्रयत्नशील होते. यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा ठरला आहे. अवघ्या साठ वर्षांत ते गेले, पण 55 पुस्तके मागे ठेवून. अजूनही काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी काही काळ काम केले. ओबीसींना न्याय मिळवून देताना त्यांनी अनेकदा कटुता स्वीकारली.
सावित्रीबाई फुले यांचा खरा पह्टो शोधण्यात आणि तो सर्वत्र पोहोचवण्यात नरके यांचे योगदान आहे. छगन भुजबळ यांच्या सोबत समता परिषदेच्या उभारणीत हरी नरके यांचा सहभाग मी जवळून पाहिलेला आहे. भुजबळांच्या प्रत्येक कामात त्यांनी नेहमीच वैचारिक पाठबळ पुरवले होते.
ग्रंथालीच्या ‘रुची’ मासिकात एकदा माझ्याविरोधात अत्यंत विखारी लेख आला होता. त्या वेळेला संतापून, पण अत्यंत संयमाने हरी नरके यांनी प्रदीर्घ लेख लिहून त्यांना चोख उत्तर दिले होते. माझी बाजू घेतली होती.
ओबीसी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्या चळवळीसाठी आणि त्यातल्या कार्यकर्त्यांसाठी सतत उभे राहणे, अभ्यासपूर्वक त्यांची पाठराखण करणे हे काwशल्य हरी नरके यांच्याकडे होते.
नितीन वैद्य निर्मित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महामानवाची गौरवगाथा’ या मलिकेसाठी हरी नरके यांनी अभ्यासक म्हणून मोठी मदत केली होती.
अलीकडे आजारपणाशी ते सतत झुंजत होते. त्यांच्या कामावरही त्याचा परिणाम झाला होता, परंतु ते जिद्द हरले नव्हते, पण आजारापुढे काही चालले नाही. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मावळली.
आज सकाळी मुंबईला येत असताना नरके यांची प्रकृती खालावली. त्यांना एशियन हार्टमध्ये दाखल केले गेले, पण तोवर खूप उशीर झाला होता. सकाळी मी एशियन हार्टला पोहोचलो तेव्हा छगन भुजबळही तिथे होते. नरके यांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले होते. चळवळीतील एक खंदा अभ्यासक साथी गमावल्याचे दुःख भुजबळ यांच्यासह सर्वांनाच आहे.
प्रा. हरी नरके यांना विनम्र श्रद्धांजली !
(लेखक विधान परिषद सदस्य असून जनता दल (युनाडटेड)चे राष्ट्रीय महासचिव आहेत. )



























































