
सरकारकडूनही पैशांची प्रतिपूर्ती नाही
मुंबईच्या सुशोभीकरणाचा मोठा गाजावाजा करीत शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात झाडे, ब्रीज, उद्याने आणि रस्त्यांच्या दुतर्फा केलेली लायटिंग, रंगवलेल्या भिंतींचा रंग उतरल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. या कामासाठी आतापर्यंत दहा महिन्यांत 450 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र कामाच्या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही.
राज्य सरकारने मुंबईच्या सौंदर्यीकरणाची घोषणा करीत प्रसिद्धीसाठी तब्बल दोन वेळा या कामांचे उद्घाटन केले. यानंतर उन्हाळय़ात अत्यंत संथ गतीने कामे करण्यात येत होती. ‘जी-20’ परिषदेच्या निमित्ताने मुंबईतील बैठकीसाठी येणाऱया प्रतिनिधींसमोर दिखावा करण्यासाठी या काळात मोठय़ा प्रमाणात कामे करण्यात आली, मात्र पावसाळय़ात आता या कामांचा रंग उतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा केलेली लायटिंग अनेक ठिकाणी बंद असून काही ठिकाणी त्याच्या वायर धोकादायकरीत्या लटकत आहेत. तर पोलवर केलेली लायटिंगही बंद आहेत. वाहतूक बेटांची स्थितीदेखील अनेक ठिकाणी अशीच झाली आहे. त्यामुळे पालिकेने केलेला खर्च वाया गेल्याची टीका करण्यात येत आहे. दरम्यान, पावसाचा जोर असल्याचे कारण पालिकेकडून सांगण्यात येत असून लवकरच केलेली सर्व कामे सुस्थितीत करण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
– राज्य सरकारने या वर्षी अर्थसंकल्पात मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी 1729 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे जाहीर केले. मात्र यातील कोणत्याही प्रकारचा निधी सरकारने पालिकेला दिलेला नाही. असे असताना पालिकेने साडेचारशे कोटींचा खर्च आतापर्यंत केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सौंदर्यीकरणाची घोषणा केली असताना निधी कधी देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.






























































