
>> वर्षा चोपडे
आपले पूर्वज सांगून गेले गरजूला मदत करावी, पण अशा गरजूला ज्याला खरोखर गरज आहे. असा गरजवंत खरा गरजवंत आहे हे शोधणे फारसे कठीण नाही. कारण पैसा असूनही पैसा नाही असे सांगणारेही आहेत. लबाड, ढोंगी किंवा सज्जन आपल्याकडे पैसे मागायला येतात तेव्हा त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांच्या नातलगाला विचारावे. नातलग बरोबर सांगतात. कारण आपण अज्ञानी असतो. भोळेभाबडे दिसणारे लोक विविध कारणे सांगून पैसे लुबाडताना दिसतात.‘‘दहा दिवसांसाठी द्या. पुढच्या महिन्यात देतो. फार अडचणीत आहे हो, मदत करा. देव तुमचे भले करेल.’’ साधे, दयाळू लोक मदत करतात, पण जेव्हा पैसे मागायची वेळ येते तेव्हा हे लोक हात वर करतात, अरेरावी करातात. ‘‘पैसे तुम्हीच बघितले का? जा नाही देत, हवे ते करून घ्या,’’ असे उर्मट उत्तर देतात. म्हणजे अडचणीत मदत करणारा मूर्ख असतो. काम झाले की, अशी लोक ओळखही दाखवत नाही. पण यात गरीब, श्रीमंत, उद्योगपती सारे आले. असो, काही कर्जबाजारी झालेली देवमाणसे पैसे येतील तसे जमा करतात. शेवटी सगळा संस्कारांचा खेळ आहे. प्रकाशने जवळच्या नातलगाचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून पैसे दिले, पण नातलग गरीब असूनही त्याने वेळेत पैसे परत केले. त्याने प्रकाशचे आभार मानले आणि कायम ऋणी राहिला.
घरी घरकाम करणाऱया बायका, मजूर, शेतकरी, व्यावसायिक सगळय़ांना पैशांची मदत हवी असते. अशा वेळी त्यांना हव्या त्या बँकेकडून किंवा संबंधित व्यक्तीकडून पैसे मिळतात, पण ते वेळेवर परत करावेत ही अट असते. बँका अशा वेळी कायद्याचा आधार घेऊन जप्ती करायला मागे-पुढे बघत नाहीत. सांगायचा मुद्दा असा की, जर कुणी अडचणीत तुम्हाला आपले समजून मदत केली तर इमानदारीने पैसा परत करणे आपले कर्तव्य असते. त्यामुळे वादही होणार नाहीत, आदरही होईल, हित संबंध जोपासले जातील आणि गुन्हेगारी वाढणार नाही. कारण पैसे मागितल्यावर अविचारी लोक कुणाचा जीवही घ्यायला मागे-पुढे बघत नाहीत. अशी अनेक उदाहरणे घडली आहेत. शिक्षण, लग्नकार्ये, दवाखाना आणि इतर कामांसाठी पैशांची देवाणघेवाण होते. जर कुणी अडचणीत आपली गरज भागवली तर पैसे नक्की परत करायलाच हवेत. कारण प्रत्येकाला संसार आणि अडचणी असतात. तसेही अडचणीत मदत केल्याचे उपकार सज्जन मनुष्य विसरत नाही आणि बेइमान ते तर सुधरतच नाहीत. त्यामुळे विचार करा आणि पैसे उसने द्या. उगाच नाही म्हणत सगळी सोंग करता येतील, पण पैशांचे सोंग नाही करता येत.



























































