
>> सुनील देशपांडे
आपण व्यवस्थित स्पेस प्लॅनिंग केले तर आपल्या स्वप्नातले घर जवळपास साकारणे नक्कीच शक्य आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात खूप कष्ट करून आपण आपल्या स्वप्नातले घर घेतो. आपण प्रत्येक स्क्वेअर फुटाला हजारो रुपये मोजतो. अशा वेळेस जर एक फूट बाय एक फूट जागा जरी वाया गेली किंवा जास्त पॅसेजेस तयार झाले व त्यामुळे आपण आपल्या घराची प्लॅनिंग करताना पाच ते दहा स्क्वेअर फूट जरी वेस्टेज घालवले तरी ते किती महागात पडू शकते याचा कधी आपण विचार केलाय का? मग आपल्या कष्टाच्या हजारो रुपयांवर पाणी सोडायचे नसेल तर स्पेस प्लॅनिंग खूप महत्त्वाचे आहे.
आपले घर डिझाइन करताना ते योग्य व्यक्तीच्या हातात देणे खूप गरजेचे आहे. जागेचे प्लॅनिंग व्यवस्थित करून प्रत्येक कोपरा नि कोपरा असा सजवावा की, योग्य ती वस्तू योग्य ठिकाणीच आहे याची खात्री करून घेणे. आपल्या काय गरजा आहेत त्याची एक यादी घरातील सर्व सदस्यांनी बसून बनवायला हवी. त्यातूनही प्राधान्यक्रमानुसार यादी बनवून व मग ती आपल्या इंटिरिअर डिझायनरला द्यावी.
आपल्या घराबाबत बऱयाच कल्पना आपल्या डोक्यात असतात. म्हणजेच मला या ठिकाणी ही वस्तू हवीय किंवा असा एक कोपरा असावा, जिथे मी माझ्याशीच तासन्तास बोलत रहावे, संगीत ऐकत रममाण व्हावे व मस्त भजी खात मित्रपरिवारासोबत पावसाची मजा घेण्यासाठी एखादा डेक असावा, पण आजकालच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये सगळे काही एका घरात मिळणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही.
तुम्ही तुमच्या गरजा, अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टीसुद्धा लिहून काढा. तुमचे घर कोणत्या ‘थिम’मध्ये असावे त्यासाठी काही ‘रेफरन्स इमेजेस’ तुम्ही काढल्या असतील तर त्या शेअर कराव्यात.
अगदी तुमच्या लहानसहान सवयी, घरातील माणसांचे स्वभाव, त्यांचे प्रोफेशन्स, आवडीनिवडी याची सखोल माहिती आपल्या इंटिरिअर डिझायनरला द्या. घरात पसारा नको असेल तर घरातील कोणतीही वस्तू कोठे असावी, त्याची जागा प्लॅनिंग स्टेजलाच निश्चित करावी.
मग पहा काय जादू घडते! हळूहळू तुमची स्वप्ने तुम्हाला कागदावर दिसायला सुरुवात होईल. मग तुमचे युनिक असे, सर्वांपेक्षा वेगळे व आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज घर सत्यात उतरेल. पाहिलेत, घरातील एकेक कोपरा व्यवस्थित प्लॅनिंग केल्यामुळे सजला व वेस्टेज न झाल्यामूळे खूप पैसेही वाचले नाही का! म्हणूनच योग्य स्पेस प्लॅनिंग करूच आपल्या घराची सजावट करण्यास सुरुवात करावी.
(इंटिरिअर डिझायनर)
[email protected]


























































