
पवार कुटुंबात मी वडिलधारा आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने मी त्याला भेटलो तर काय बिघडले, असे परखड मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. अजित पवार यांना भेटलो तरी भाजपाबाबतच्या माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही, असे परखड मतही शरद पवार यांनी मांडले.
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच पुणे येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली होती. त्या वेळी दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकारणात रंगली होती. त्याबाबत आज सांगोला येथे शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता. मात्र ती अजिबात गुप्त बैठक नव्हती, तुम्हाला काही कामे नाहीत, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.
इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत 31 ऑगस्ट रोजी प्राथमिक कार्यक्रम ठरवला जाईल आणि 1 सप्टेंबर रोजी देशातील 40 पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करतील, अशी माहिती या वेळी शरद पवार यांनी दिली.
भाजपकडून सत्ता काढून घेणे हाच अजेंडा
पंतप्रधान पदावरून कॉंग्रेसबरोबर कोणतेही वादविवाद होणार नाहीत असे सांगतानाच, भाजपाकडून सत्ता काढून घेणे हाच इंडिया आघाडीचा अजेंडा असल्याचे शरद पवार या वेळी म्हणाले.
2024पूर्वीच राज्य सरकार कोसळणार
2024पूर्वीच राज्य सरकार कोसळणार, असे भाकीतही या वेळी शरद पवार यांनी केले. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार दुःखी असून त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. 2024पर्यंत त्यांच्या भूमिकेत बदल होईल, असे शरद पवार म्हणाले.
भाजपसोबत जाणार नाही
भाजपाबरोबर युती करणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणात बसत नाही असे सांगत त्यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चेवरही या वेळी पडदा टाकला. आमच्यातील काही सहकाऱयांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली, पण त्यांच्यामध्ये काही परिवर्तन घडेल यासाठी आमचे अन्य सहकारी आणि हितचिंतक प्रयत्न करत आहेत, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही, अशी भूमिका मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अध्यक्ष म्हणून मांडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.



























































