
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या बीडमध्ये स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शरद पवारांची सभा रेकॉर्डब्रेक होईल, असा अंदाज लावला जात आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिकनंतर दुसरी सभा बीडमध्ये होत आहे. उद्या बीडमध्ये होत असलेल्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. 25 हजार लोक बसतील एवढ्या मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीनंतर उडालेले राजकीय दावे-प्रतिदाव्यांवर पवार काय बोलतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. सभेचे नियोजन आणि आयोजन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. बंडखोरांना धडकी भरवणारी ही सभा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
























































