
>> सुहास मळेकर
घराच्या समोरून जाणारी व्यक्ती दरवाजाच्या फटीतून अंधारात मागच्या भिंतीवर उलट दिशेने जाताना का दिसते आणि ती व्यक्ती दरवाजाला भोक पाडून भिंग लावून स्पष्ट करता आली तर… आणि भिंग लावल्यावर तीच व्यक्ती ‘खाली डोकं वर पाय का दिसते?’ म्हणून कुतूहलापोटी कॅमेऱयाचं पायाभूत संशोधन करणाऱया सामान्यजनांच्या दृष्टीने त्या वेडय़ा तरुणाचे जेव्हा जेव्हा छायाचित्रणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा स्मरण व्हावे असे वाटते म्हणून हा प्रपंच!
त्यानंतरच्या अथक प्रयासांनतर घराच्या आकाराचा पहिला कॅमेरा जन्माला आला. अनेक जिज्ञासूंच्या अनेक प्रयोगानंतर गरजेनुसार टप्प्याटप्प्याने त्यात सुधारणा आणि बदल होत गेले.
ट्रॉलीवरून हलवता येणारा प्रचंड मोठा पेटारा, त्यानंतर इतस्ततः सहज वाहून नेता येईल अशी लाकडी पेटी, नंतर दोन हातात धरता येईल असा खोका आणि मग आता आपल्या अलिकडच्या दोन पिढय़ांनी पाहिलेला पोर्टेबल कॅमेरा. दरम्यान आपल्याला सहज दिसत असलेली प्रतिमा एखाद्या पृष्ठभागावर पकडता आली तर आणि ते यशस्वी झाल्यानंतर ती प्रतिमा अनंतकालापर्यंत जतन करून ठेवता आली तर असे दुसऱया बाजूला केमिकल आणि पेपरवर रासायनिक प्रयोगसुध्दा झाले.
अशा अनेक संशोधकांच्या प्रयत्नांतून ‘स्थावर ते जंगम’ टप्प्या टप्प्याने प्रगत झालेला, आपल्या खिशात सहज मावणारा कॅमेरा आणि त्याच्यातून मिळालेल्या प्रतिमा आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग होऊन राहिला आहे.
यातून नवीन क्रांती झाली ती कॅमेऱयातून सरळ फिल्मवर चित्र उमटण्यापासून ते डिजिटल इमेज कॅमेऱयावर आणणाऱया नवीन तंत्रज्ञानाने. मात्र यामुळे छायाचित्रण कला ही केवळ कलाकारांपुरती मर्यादित न राहता मोबाइलमुळे जगातल्या कानाकोपऱयांत घराघरांतून ती परिचित झाली. एक काळ असा होता की, फोटोग्राफी करण्यासाठी तंत्रज्ञान अवगत असणे आवश्यक होते. कारण कॅमेरा हे यंत्र कलात्मकरीत्या हाताळणे आणि विशेषतः ती मौल्यवान वस्तू सांभाळणे जिकिरीचे होते.
आता कला आणि तंत्रज्ञानाचा बराचसा भाग कॅमेराच सांभाळतो. ‘दिसली फ्रेम की क्लिक करता येणे’ सोपे झाले. त्यामुळे ही अभिजात कला आणि या कलाकारांचे काही प्रमाणात नुकसान झाले हे मान्य करायलाच हवे. अलीकडे छायाचित्रणाचे सर्वसामान्य ज्ञान सर्वांना अवगत झाले तरी काही अपवाद वगळता त्याच्या मुळाशी जायला कुणाला वेळ नसतो. अनेक शास्त्रज्ञांनी अथक प्रयोग करून कॅमेरा आजच्या सुस्थितीत आणला, त्यांच्याविषयी कृतज्ञता हवी.
अनेकांनी या संशोधनात आपले मोलाचे योगदान दिले असले तरी कॅमेऱयाच्या इतिहासात नोंद झाली 1826-27 मध्ये, फ्रान्समधल्या जोसेफ निप्सीच्या पहिल्या छायाचित्राची. निप्सी इतिहासात नोंद झाला आणि जगासमोर आला. मात्र जगाच्या दृष्टीने वेडा असलेला, चित्र पकडून ठेवण्याचा ध्यास प्रथम घेतलेला तो छायाचित्रण कलेचा जन्मदाता अवलिया आजच्या मानवी शिरस्त्याप्रमाणे गुलदस्त्यातच राहिला.























































