वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी परळीत तयारी पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रावण महिन्यानिमित्त देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.मंदिर परिसराला पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टचे 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन काळजी घेतांना दिसत आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत येत असतात. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने तयारी पूर्ण केलेली आहे. मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे. अधिक मासानंतर येत असलेल्या नीज श्रावणामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 17 ऑगस्ट गुरूवार रोजी श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने स पहाटे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट ट्रस्टच्या वतीने रुद्राभिषेक करण्यात आला. पहिला श्रावण सोमवार 21 ऑगस्ट रोजी असून 20 ऑगस्ट रविवारी रात्री 12 वाजल्यापासुनच प्रभू वैद्यनाथाचे दर्शन सुरु होणार आहे.मंदिर परिसरात देवस्थाचे सुरक्षारक्षक आणि स्वछता कर्मचारी असणार आहेत.

भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून धर्म दर्शनाची महिला – पुरुष असे प्रत्येकी वेगळी रांग असणार आहे. तर पास ची स्वतंत्र रांग करण्यात आलेली आहे. मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची झडती घेऊनच आतमध्ये सोडण्यात येणार आहे. यामध्ये तिन्ही रांगांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर लावण्यात आलेले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या देखरेखेखाली मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, सह पोलीस निरक्षक / पोलीस उप निरीक्षक, महिला, पुरुष कर्मचारी, होमगार्ड असा अंदाजे 150 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

श्रावण सोमवारनिमित्त शिवमुठीचे धार्मिक महत्व असते. पहिल्या सोमवारी तांदुळाची शिवमुठ अर्पण केल्यास इच्छित मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे. या दिवशी परळीतील महिला भाविक वर्ग मोठ्या प्रमाणावर वैद्यनाथाला तांदुळाची शिवमूठ दान करून प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करतातअशी माहिती पुरोहित राजेंद्र दगडगुंडे यांनी दिली. भाविकांना दर्शनासाठी दोन रांगांची व्यवस्था देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आली असून यामध्ये महिला पुरुषांच्या वेगळ्या रांगा असणार आहेत तर पासची वेगळी रांग असणार असून यासाठी देवस्थान ट्रस्ट कडून 100 रुपयांचे शुल्क आकारण्यात आलेले आहे हे पास मंदिराच्या पायऱ्याजवळ उपलब्ध होणार आहेत अशी माहिती बाबासाहेब देशमुख – सचिव, श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट यांनी दिली.