मी होणार करोडपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
2000-note

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

मित्रांनो जेव्हा आपल्याला चक्रवाढ पद्धतीने व्याज आपल्या गुंतवणुकीवर मिळते, तेव्हा आपली गुंतवणूक कितीतरी पटीने वाढत जाते. जेवढा जास्त परतावा तेवढी मुद्दलाची जोखीम जास्त. परताव्याप्रमाणे यात कुठल्या गुंतवणुका आहेत आणि त्यांचे स्वरूप काय, हे आजच्या लेखात जाणून घेऊया. 

आपल्या देशाचा रेपो रेट 6.5 टक्के आहे. साधारण याच्या आसपास व्याजदर देणाऱया गुंतवणुका सुरक्षित गुंतवणुकामध्ये मोडतात. यामधील पैसा कधीही शेअर मार्केटमध्ये गुंतवला जात नाही. या गुंतवणुकांचा आधार घेऊन जर आपल्याला करोडपती व्हायचे असेल तर आपल्याला किती गुंतवणूक करायला लागेल ते जाणून घेऊया.

 वयाच्या 25 व्या वर्षी जर गुंतवणुकीला सुरुवात केली व वयाच्या साठाव्या वर्षी जर एक करोड हवे आहेत तर फक्त सुरक्षित गुंतवणुकीच्या माध्यमातून दरमहा 5520/- गुंतवून 7 टक्के व्याजदरानेदेखील करोडपती होता येते. मात्र हीच गुंतवणूक वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी चालू केली तर दरमहा 31 हजार 366/- भरून करोडपती होता येईल आणि हीच गुंतवणूक वयाच्या पन्नासाव्या वर्षी सुरू केली तर करोडपती होण्यासाठी दरमहा 57 हजार 440/- इतकी मोठी रक्कम गुंतवावी लागेल. जेवढय़ा लवकर गुंतवणुकीला सुरुवात करू तितकी कमी रक्कम करोडपती होण्यासाठी गुंतवावी लागेल.

 सुरक्षित आणि जोखीम…दोन्हीही

गुंतवणूक करताना जशी आपण जोखीम घेतो तितके परताव्याचे प्रमाण वाढते. या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या  मुद्दलामध्ये घट येऊ शकते, पण अशाच गुंतवणुकांमध्ये 8 टक्के ते 25 टक्के परतावा देण्याची क्षमता असते. काही गुंतवणुकांमध्ये सुरक्षित व जोखीम एकत्रित असतात. या गुंतवणुकांमध्ये 8 टक्के  ते 12 टक्के देण्याची क्षमता असते.

 समजा आपण 12 टक्के परतावा मिळेल असे गृहीत धरले आणि 25 व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात केली तर वयाच्या साठाव्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर दरमहा 1540/- गुंतवावे लागतील. हाच गुंतवणुकीचा दर 15 टक्के असेल तर फक्त दरमहा  673/- गुंतवावे लागतील, पण गुंतवणूक करताना सर्वच पैसे जोखीम असलेल्या गुंतवणुकीमध्ये न गुंतवता काही पैसे सुरक्षित गुंतवणुकीमध्ये गुंतवले गेले पाहिजे.

 समजा 25 वर्षांच्या व्यक्तीने करोडपती होण्यासाठी सुरक्षित व जोखीम असलेल्या गुंतवणुकांमध्ये समान विभागून गुंतवणूक केली तर वयाच्या साठाव्या वर्षी 50 लाख मिळण्यासाठी दरमहा 2760/- गुंतवावे लागतील. त्याचप्रमाणे जोखीम असलेल्या गुंतवणुकीतून 50 लाख मिळण्यासाठी 15 टक्के दराने दरमहा 336/- गुंतवावे लागतील. म्हणजेच दोन्ही गुंतवणुका मिळून दरमहा 3096/- भरून करोडपती होता येईल. त्यामुळे एकप्रकारे जोखीमेचे नियोजनदेखील होईल. जर दोघांचा ऍव्हरेज काढला तर 10.5 टक्के होतो. म्हणजेच बॅलन्स जोखीम घेऊनही 6 टक्के ते 7 टक्के मधल्या महागाईला हरवता येऊ शकते. दरमहा 673/- रुपये गुंतवणूक करून करोडती बनण्याची कल्पनादेखील तेवढीच रोमांचक आहे.

[email protected]