आगामी गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या परीक्षा न घेण्याचे आदेश शाळांना देण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्यात 19 ते 28 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा होणार आहे. या उत्सव कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी अनेक पालकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी, शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना निवेदन दिले. सर्व सण/ उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरे होत आहेत; परंतु काही कॉन्व्हेंट शाळा जाणुनबुजून या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या लेखी, तोंडी अथवा प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे अशा शाळांना उत्सव काळात कोणत्याही परीक्षा न घेण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. मुंबईतील कोकणवासीय गणेशोत्सवात आपल्या कुटुंबासह मूळ गावी जातात. शाळांना पाच दिवसांची गणपतीची सुट्टी दिली जाते; परंतु परतीच्या प्रवासाला दळणवळण साधनांची कमी, अत्यंत वाईट रस्ते असल्यामुळे त्या कालावधीत गावावरून परतणे शक्य होत नाही. त्यामुळे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी काळात परीक्षा न घेण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आहे. युवासेनेच्या निवेदनावर कार्यवाहीचे निर्देश देऊन परीक्षा न घेण्याचे आदेश देण्याचे आश्वासन राजू तडवी यांनी दिले. असेच निवेदन शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले आहे.
























































