
>> अजित कवटकर, [email protected]
सत्तेच्या मत्तेदारीचा अट्टाहास बाळगून हुकूमशाही पद्धतीने जर कोण अंध – मुकी – बहिरी लोकशाही आपल्या देशात रुजवू पाहत असेल तर ती लोकशाहीची हत्याच होय. असे करणाऱ्यांनी इतरांना धर्म शिकवू नये. हिंदुत्व म्हणजे राजकारण नव्हे. कोण्या पक्षाचा अजेंडा हा हिंदुत्वाची व्याख्या ठरू वा ठरवू शकत नाही. लोकशाहीतून, लोकशाहीने आणि लोकशाहीला जे मान्य होते तेच नम्रपणे स्वीकारणे म्हणजे लोकशाही आणि हिंदुत्व. म्हणूनच लोकशाहीवादीच खरा हिंदुत्ववादी!
चार हजार वर्षांपेक्षाही पुरातन असल्याचे दाखले उपलब्ध असले तरी आपला हिंदू धर्म हा सनातन होय. हिंदू हा पंथ वा धर्म म्हणून उदयास आला नाही, तर ते सिंधू घाटीच्या नैसर्गिक पर्यावरणात बहरणाऱ्या मानवी संस्कृती, सभ्यतेला व जीवन पद्धतीला प्राप्त झालेले नाव आहे. याला ना आदी आहे, ना अंत आहे आणि म्हणूनच तो सनातन. वेद, उपनिषदे, पुराण यांनी या जीवन पद्धतीवर संस्कार केले. त्यांच्या शिकवणीतून रुजलेली तत्त्वं, नैतिकता, मूल्यं, आदर्श यातून सात्त्विक संस्कृती बहरली. अर्थ, काम, धर्म, मोक्ष हे पुरुषार्थ मानवी जीवनाची परिभाषा झाली. धर्माने आदर्श नियमांची चौकट तयार केली. लिखित-अलिखित रूपात असलेल्या या अपेक्षित वर्तणुकीचे पालन हे या ‘वंदे मातरम’ भूमिप्रती असलेल्या आदराला बंधनकारक वाटले आणि आजही वाटतात. म्हणूनच इथे संस्कार, सभ्यतेला अनन्यसाधारण महत्त्व व प्राथमिकता मिळाली. जीवनशैलीत, जीवनपद्धतीत, व्यवहार, वर्तणुकीतून त्यांचे शुद्ध दर्शन हीच ‘हिंदू’ची व्याख्या. हे ज्या भूमीत प्रकर्षाने जाणवते तो हिंदुस्थान होय. हा ‘हिंदुइझम’ टिकवणे प्रत्येक हिंदुस्थानीची विशेष जबाबदारी आहे.
हिंदू वा हिंदुत्वाला अभिप्रेत असणाऱ्या नीतितत्त्वांची जेव्हा जाणीवपूर्वक पायमल्ली होते तेव्हा ती वर्तणूक या सभ्यतेला बदनाम करते. लोकशाही ही आपल्या हिंदू सभ्यतेने या भूमीला दिलेला एक आदर्श संस्कार होय. इथले राज्यकर्ते आज त्याच लोकशाहीचे आपल्या मनाप्रमाणे, परिस्थितीनुरूप, स्वार्थासाठी वाटेल तसे शोषण करत आहेत, त्यास खेळवत आहेत. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी राज्यकर्ते लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीचाच खात्मा करून ज्या अयोग्य, अन्यायी, अत्याचारी पद्धतीने, एकाधिकारशाहीने शासन करत आहेत, ते हिंदुत्वाला कोणत्याही प्रकारे मान्य नाही आणि म्हणून तसे करणारा खरा हिंदू आहे का? हा प्रश्न इथे उपस्थित होणे नैसर्गिक आहे.
विभिन्नतेत एकता असे येथील सामाजिक स्वरूप हे शतकानुशतकांच्या धार्मिक – सांस्कृतिक सहिष्णुतेचे व औदार्याचे फलित होय. स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारणा चळवळींनी बऱ्याचशा अन्यायकारक चालीरीती, वाईट रूढी-परंपरांना मूठमाती दिली. काही कर्मठांनी हिंदू धर्म विचारांवर चढवलेली अंधश्रद्धा, पुराणमतवादाची जळमटे प्रबोधन युगातील वैचारिक क्रांतीने काढून टाकली. शुद्ध हिंदुत्वाचा नैसर्गिक वैज्ञानिक दृष्टिकोन पुन्हा प्रकाशित झाला. जातीयवादाची प्रखरता कमी होऊ लागली. आपल्या देव – धर्माचा अभिमान म्हणजे इतरांच्या देव-धर्माचा द्वेष नव्हे. आपल्या धर्मविचारांतील मानवतावादी महत्तेचा प्रसार नम्रपणे करणे हे हिंदुत्ववादाला अधिक अभिमानास्पद होते. आपल्या धर्म-संस्कृतीचे मूळ हे शुद्ध, निर्मळ, सात्त्विकच आहे. शिवाय इतर संस्कृतींमधील जे जे काही माणुसकीला श्रेष्ठत्व प्रदान करणारे संस्कार होते, ते ते आपण स्वीकारल्याकारणाने ‘हिंदू’ ही विचारधारा सर्वव्यापी झाली, स्वीकारार्ह झाली, अनुकरणीय झाली. हिंदुस्थान हे नैसर्गिकरीत्या हिंदू राष्ट्र असले तरी आपण स्वीकारलेली धर्मनिरपेक्षता यातच आपल्यातील सहिष्णुता, अनुकंपा दिसून येते. हिंदू या धर्म, संस्कृती, विचारधारेला लाभलेलं व्यक्तिमत्त्व म्हणूनच अधिक विश्वासार्ह वाटते. ‘वसुधैव कुटुंबकम्’चे आपले आतिथ्य तर जगासाठी आदर्श आहे. आपली विचारधारा ही निरंतर वाहणारा वैचारिक प्रवाह आहे. ‘ऊँ’ ध्वनीच्या शक्तिनादात जीवनाचा धर्म सांगणारा हा प्रवाह आपल्या तत्त्वनिष्ठ लवचिकतेमुळे आजपर्यंत कधीच कशात गुरफटून पडला नाही. आपली आत्मिक सात्त्विकता टिकवत या प्रवाहाने आवश्यक तिथे आणि गरजेनुसार योग्य ती वळणं घेत प्रतिकूल परिस्थितीला टक्कर दिली, परंतु धर्माचा आत्मा किंचितही मलिन होऊ दिला नाही. त्याचे श्रेष्ठत्व अबाधित राखले, परंतु आज सत्ताकारण हे धर्माला राजकारणात ओढून हिंदू संस्कृती, सभ्यतेच्या निरागसतेला गलिच्छ, विद्रूप करू पाहत आहे. सत्ताधाऱ्यांचा सत्तास्वार्थ जेव्हा धर्माचा आधार घेत त्याच्या आडोशाने अन्याय, अत्याचार, अधर्म करू लागतो तेव्हा तो हिंदू या जीवनविचाराला सर्वात मोठा धोका असतो.
आपल्या देशात धर्मवाद, जातीयवाद, प्रांतवाद, भाषावाद हे प्रत्येक वेळेस एखाद्याच्या अतिरेकी विकृतीमुळेच उद्भवले असे नाही, तर ते बहुतेक वेळा विनाकारण, जाणीवपूर्वक निर्माण केले गेले. ‘फोडा आणि राज्य करा’ या कूटनीतीचा प्रयोग आज आपलेच आपल्यावर करत असल्याचे अनुभवास येत आहे. देवांवर आणि धार्मिक स्थळांवर मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आज असा समज पसरविला जात आहे की, यांना पाठिंबा न देणारा, मतं न देणारा हा जन्मजात हिंदू जरी असला तरी तो हिंदू वा हिंदुत्ववादाच्या विरोधात आहे. देशातील एकसंधता, एकात्मता, बंधुता कलुषित करून ती संपविण्याचा हा प्रयत्न नव्हे का? हे सर्व कशासाठी तर आपली सत्ता टिकवण्यासाठी? असे करणारे खरे हिंदू वा हिंदुत्ववादी कसे? मग त्यांना इतरांना देशद्रोही, हिंदूविरोधी म्हणण्याचा अधिकार काय?
सत्तेच्या मत्तेदारीचा अट्टाहास बाळगून हुकूमशाही पद्धतीने जर कोण अंध – मुकी – बहिरी लोकशाही आपल्या देशात रुजवू पाहत असेल तर ती लोकशाहीची हत्याच होय. असे करणाऱ्यांनी इतरांना धर्म शिकवू नये. कारण धर्माने अशी शिकवण आजपर्यंत कधी कुणाला दिली नाही. हिंदुत्व म्हणजे राजकारण नव्हे. कोण्या पक्षाचा अजेंडा हा हिंदू वा हिंदुत्वाची व्याख्या ठरू वा ठरवू शकत नाही. त्यावर आजपर्यंत कोणी अधिकार गाजवला नाही. त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु त्या विचारधारेचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि त्याच्या आदर्शांवर निर्माण झालेल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी शस्त्र उचलून शौर्य गाजवण्याचा ‘धर्म’ नक्कीच केला. शिवाय त्याचा कधी स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी वापर केला नाही किंवा साम, दाम, दंड, भेद या नीतीने लोकांच्या विचारांना जबरदस्तीने मुरड घालण्याचा प्रयत्न केला नाही. लोकशाहीतून, लोकशाहीने आणि लोकशाहीला जे मान्य होते तेच नम्रपणे स्वीकारले. म्हणूनच लोकशाहीवादीच खरा हिंदुत्ववादी म्हणता येईल.





























































