
>> वैश्विक
आकाशाशी जडलेले नाते सध्या पावसामुळे अवघडले आहे. नाहीतर आकाशात नवीन काय हे कळायचाच अवकाश की, लगेच लेख तयार होतो. ‘लेटेस्ट इन ऍस्ट्रॉनॉमी’ म्हणजे खगोलात सध्या नवं काय चाललंय याच्या वार्ता मात्र मिळत असतात. आता प्रत्यक्ष आकाशदर्शन नाही, तर थोडी थिअरॉटिकल किंवा खगोल चिंतनात्मक वार्ता शोधावी म्हणून गुगल पाहिलं तर सेरेस या खुज्या ग्रहाच्या पट्टय़ात असलेल्या अनेक विखुरलेल्या अशनींविषयी कॅलिफोर्नियातल्या स्टीफन केन यांनी केलेल्या एका ‘सिम्युलेशन’ची (कल्पनाचित्र) माहिती मिळाली. विज्ञानातली कल्पनारम्यताही सत्याला धरून असते. खगोलीय वस्तूंच्या सांप्रतच्या अस्तित्वाचा अर्थ लावताना त्यातून काही नवे सुचते. ते घडणार नसते, पण घडले असते तर काय बिघडले असते याची जाणीव करून देते.
आपल्याला एव्हाना ग्रहमाला ‘पाठ’ झालीय. सूर्यापासून पहिला बुध, मग शुक्र, त्यानंतर पृथ्वी, पुढचा मंगळ आणि त्यापलीकडे… थांबा! त्यापलीकडे ‘गुरू’च आहे, पण त्याच्या अलीकडे काय आहे तेही महत्त्वाचे. मंगळ आणि गुरूच्या मध्ये आहे एक अशनींचा पट्टा. म्हणजे सुमारे 11 ते 19 लाख महापाषाण एका पट्टय़ातून एखाद्या ग्रहासारखे सूर्याभोवती गरगरतायत. साधारण सूर्य, पृथ्वी अंतराइतकंच (15 कोटी कि.मी.) एवढं त्यांचं आपल्यापासूनचं अंतर आहे. मध्ये सात कोटी किलोमीटरवर मंगळ आहे ना!
या अशनींच्या पट्टय़ाची कहाणी म्हणजे एक प्रचंड ग्रह फुटून त्याचा जो चुरा झाला तो या भागात विखरून त्याच गतीने सूर्याला परिक्रमा करत राहिला. आता मंगळापर्यंतचे सर्व ग्रह घट्ट पृष्ठभाग असलेले आहेत. गुरू, शनी, नेपच्यून यांच्या केंद्रस्थानी घनगोल असले तरी त्यांचे विशाल कवच वायुरूप आहे. म्हणूनच त्यांना वॉशिअस प्लॅनेट म्हटलं जातं. मंगळ आणि गुरू यांच्या मध्ये आणखी एखादा ग्रह असता तर? त्याचा एकूण सौरमालेवर काय परिणाम झाला असता? सध्या इतर सर्व ग्रह आहेत त्याच जागी राहिले असते का? पृथ्वीला आता आहे तसा चंद्र लाभला असता का? मुळात पृथ्वी वस्तीयोग्य कक्षेतच फिरत राहिली असती की नसती? मग पृथ्वीवर जीवसृष्टी आणि आपण असा विचार करायला अवतरलो असतो का? अनंत विश्वातले असे अनंत प्रश्न.
अशा प्रश्नांचा मागोवा घेत त्यात भरपूर ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ म्हणजे चित्रपटीय स्वातंत्र्य वापरून कुणी हॉलीवूड, बॉलीवूडवाले सिनेमाही काढू शकतात, परंतु नुसती चटकदार ‘फॅन्टसी’ म्हणजे विज्ञान नव्हे. त्याचा किमान मूलाधार तरी वैज्ञानिकच असायला हवा ना! तर ती एक निराळीच गोष्ट. आपण विचार करत होतो तो स्टीफनने केलेल्या सिम्युलेशनचा.
काय आढळलं त्याला या अभ्यासात? त्याने हे अशनी पट्टय़ातले सगळे विस्कळीत तुकडे कल्पनेत ‘गोळा’ करून त्याचा एक गोळा किंवा ‘हरवलेला’ ‘ग्रह’ पुन्हा ‘बनवला’. सिम्युलेशनमध्ये काहीही करता येते, पण ते विधायक असलं तरच ज्ञानार्जन होऊ शकतं. त्याच्या अभ्यासाचा विषय होता की, समजा या अशनी पट्टय़ातल्या ‘सेरेस’ या लघुग्रहासकट सर्व वस्तुमान एकत्र केलं तर केवढा ‘ग्रह’ तिथे असायला हवा? तर तो पृथ्वीपेक्षा मोठा वायुरूप ग्रह ठरला असता.
मंगळापलीकडचा गुरू हा वायुरूप ग्रह. फारच दूर (977 कोटी कि.मी.) असल्याने आपल्याला त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा धोका नसतो. उलट अनेक अशनी आणि धोकादायक धूमकेतू (शुमेकर-लेव्ही-9 सारखे) तो स्वतःकडे खेचून घेतो आणि पृथ्वीला वाचवतो, परंतु हा मधलाच ग्रह निर्माण झाला तर? तर साहजिकच ग्रहमाला म्हणजे अवघे सौरसंकुल डळमळेल! त्याच्या प्रभावामुळे सर्वच ग्रहांच्या कक्षा बदलतील आणि छोटा बुध तसेच पृथ्वी आणि चंद्रसुद्धा सध्याच्या सूर्यमालेबाहेर फेकले जातील! म्हणजे कल्पनारम्यतासुद्धा उत्पाती आहे.
या अशनी पट्टय़ातला लघुग्रह ‘सेरेस’ 1 जानेवारी 1801 म्हणजे तसा अलीकडेच शोधला तो ग्युसेपी पियाझी या इटालियन संशोधकाने. सिसिलीमधून अवकाश न्याहाळताना त्याला या 940 किलोमीटर व्यासाच्या लघुग्रहाचं दर्शन झालं. तो आपल्या दीड ते दहा लाख लहानमोठय़ा ‘भावंडां’सह मंगळ-गुरूच्या मध्ये भिरभिरत आहे. हे सगळे एकाच कक्षेत असल्याने ‘सेरेस’ला ग्रहाचा दर्जा देता येत नाही. याच कारणामुळे 2006 मध्ये प्लुटोची ग्रहपदावरून गच्छंती झाली. आता नेपच्यूनपर्यंतचे आठ ग्रहच ग्रहपद भूषवतात.
मंगळ-गुरूच्या मधला हा ‘काल्पनिक’ ग्रह सौरमाला तयार होत असतानाच निर्माण झाला असता तर? तर पृथ्वी आहे त्या ठिकाणी नसती, आपणही हे लिहायला-वाचायला अस्तित्वात नसतो! …पण असं तरी कसं म्हणावं? कदाचित एका वेगळय़ा ‘हॅबिटेबल झोन’ किंवा वसाहतयोग्य ठिकाणी जीवसृष्टी तयार झाली असती तर? तर आपण त्याच ग्रहाला कदाचित ‘पृथ्वी’ म्हटलं असतं… हेही काल्पनिक ‘सिम्युलेशन’च!

























































