
काही कर्जे ही कमी कालावधीची असतात, तर काही कर्जे जास्त कालावधीची असतात. कमी कालावधीची कर्जे तर संपून जातात, पण जास्त कालावधीची कर्जे संपता संपत नाहीत. अशा कर्जांमध्ये गृहकर्जाचा समावेश होतो. हे कर्ज अगदी 30 वर्षे कालावधीसाठीदेखील असतात, पण हे कर्ज लवकर संपवून कर्जमुक्त व्हायचे असेल तर काही गोष्टी करून पहाच.
– समजा आपण 50 लाखांचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी घेतले असेल व व्याजाचा दर 9 टक्के असेल तर आपला मासिक हप्ता रुपये 44,651 येतो. 20 वर्षांत आपण व्याजासहित 1 कोटी 7 लाख 16 हजार 240 इतके पैसे भरतो आणि यात 57 लाखांचे व्याजच आहे. जर का आपण आपल्या हप्त्यामध्ये 10 टक्के रक्कम वाढवून जर हप्ता 49,116 केला तर आपले कर्ज 16 वर्षांत संपते. कर्ज व व्याजापोटी साधारण 90 लाख 43 हजार 972 एवढी रक्कम जाते आणि व्याजाचे 17 लाख रुपये वाचतात.
हाच जर हप्ता 20 टक्के वाढवून रुपये 53,581/- केला तर आपले कर्ज अगदी 13 वर्षांत संपेल. या 13 वर्षांत कर्ज व व्याजापोटी आपले जातील फक्त 83 लाख 58 हजार 638 रुपये आणि आपले व्याजाचे 27 लाख वाचतील.
– कर्जाचा हप्ता न वाढवता जर हप्त्याच्या 10 टक्के रक्कम म्युच्युअल फंडच्या इक्विटी एसआयपीमध्ये गुंतविली तर कर्ज संपल्यावर किती गंगाजळी हाती येते ती पाहू या. हप्त्याच्या 10 टक्के रक्कम म्हणजे 4465/- रुपये. हीच रक्कम दरमहा गुंतविली व त्यावर 12 टक्के दराने परतावा मिळाला तर 4,46,1195/- एवढे जमा होतील. म्हणजेच आपण भरलेली व्याजाची रक्कम भरल्याप्रमाणेच आहे. जर आपण हप्त्याच्या 20 टक्के रक्कम बचत करायची ठरविलीत तर दरमहा 8930/- रुपये होतात. हेच जर पुढील 20 वर्षांसाठी 12 टक्के परताव्याप्रमाणे गणित मांडले तर 8,92,2390/- इतके होतात. म्हणजेच भरलेले व्याज व काही प्रमाणात मुद्दलही मिळाल्याप्रमाणे आहे.
इथे मानसिकता लक्षात घेऊ या. एक ठरावीक हप्ता बांधला असेल तर तो जबरदस्ती भरला जातो, पण जर बचत ऐच्छिक असेल तर मध्येच बंद करता येते. जमा झालेले पैसे दुसऱयाच कारणासाठी वापरले जाऊ शकतात. असे जर झाले तर वेगळी बचत करून 20 वर्षांत विशेष रक्कम जमा होणार नाही. हप्ता भरणे ही मुळात शिस्तबद्ध गोष्ट आहे, पण ऐच्छिक बचत ही जर शिस्तबद्द करता आली तर तेही गणित फायदेशीर होईल. मग वाढवाल ना थोडा जास्त हप्ता किंवा चालू कराल ना एसआयपी. चला तर लवकर कर्जमुक्त होऊ या आणि मोकळा श्वास घेऊ या.
>> चंद्रहास रहाटे,
आर्थिक सल्लागार
[email protected]
























































