
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत तहसील कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. पावसाने पाठ फिरवल्याने सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख भगवान दराडे यांच्यासह पदाधिकारी भाऊसाहेब धस, रामकिसन भिसे ,केशव खेडकर आदींसह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक तहसील कार्यालयात गेले व कार्यालयाच्या बाहेर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी बोलताना भगवान दराडे म्हणाले की, सध्या तालुक्यात दुष्काळ पडला असला तरीही शासन दुष्काळ जाहीर करत नाही. तातडीने तालुका दुष्काळी जाहीर करून जनावरांसाठी छावण्या सुरु करत ज्या गावात गरज आहे त्या गावात तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरु करावा. तसेच दुष्काळी कामेही सुरु करण्यात यावी. सध्या पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खते टाकली. मात्र पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली असल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. या नंतर आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी तहसीलदार शाम वाडकर यांना दिले.



























































